शिवसेनेच्या योजना चिरंतन विकासाच्या
By Admin | Updated: October 8, 2014 01:09 IST2014-10-08T01:09:38+5:302014-10-08T01:09:59+5:30
औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर चिरंतन विकास करणाऱ्या योजना तयार ठेवल्या आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या योजना चिरंतन विकासाच्या
औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर चिरंतन विकास करणाऱ्या योजना तयार ठेवल्या आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी सभेत बोलताना केले.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम असलेले टॅब्लेट देण्यात येईल. त्यामध्ये उर्दूसह सर्व भाषांनिहाय अभ्यासक्रम असेल. क्रांतिकारी घटनांचा इतिहासही त्यात असेल. ग्रामीण भागातील मुलांना नामांकित संस्थांची ड्रिगी आहे त्या भागात शिकून मिळविता येईल. इंद्रधनुष्य, शिवआरोग्य योजना तयार केल्या आहेत. शिवआरोग्य योजनेत रुग्णांना एकात्मिक उपचाराची सोय करून देण्यात येईल. पापड आणि लोणचे तयार करणे म्हणजे महिला बचत गट नव्हे. लोकल टू ग्लोबल उत्पादनांशी बचत गट बरोबरी करतील. त्यासाठी त्यांना शिवशाहीचे शासन अर्थसाहाय्य देईल. शेतीसाठी स्वतंत्र बजेट असेल. शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी उपसण्यासाठी स्वयंचलित ऊर्जेचे साधन देण्यात येईल. संत विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना ठाकरे यांनी बोलून दाखविली.
भाजपाचा जावईशोध
गुजरात, छत्तीसगढ या राज्यांत भाजपाची सत्ता होती. तेव्हा देशात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. असे असताना त्या दोन्ही राज्यांचा विकास झाला नाही का? मग दिल्लीत भाजपाचे सरकार असल्यामुळे राज्यात भाजपाचे सरकार आले तरच विकास होईल. हा भाजपाचा जावईशोध नाही का, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेचे सरकार आल्यावर शहरातील विविध विकास योजना अडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सेना पक्षप्रमुख ठाकरे यांची मागील पाच वर्षांत झालेल्या सभेच्या तुलनेत आजच्या सभेला मोठी गर्दी होती. लोकसभा निवडणुकीलादेखील खा. खैरे यांना सभेसाठी गर्दी जमविता आली नव्हती. आ. प्रदीप जैस्वाल व त्यांच्या टीमने आजच्या सभेचे नियोजन केले होते. व्यासपीठावरील शिवसेनाप्रमुख आणि पक्षनिशाणीचे होर्डिंग लक्षवेधी होते.