शिवसेनेच्या राम-लक्ष्मणामध्ये महाभारत!
By Admin | Updated: November 6, 2014 01:37 IST2014-11-06T01:10:00+5:302014-11-06T01:37:34+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातून माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा पराभव झाल्यामुळे आज मध्यवर्ती प्रचार कार्यालयातील चिंतन बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले.

शिवसेनेच्या राम-लक्ष्मणामध्ये महाभारत!
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातून माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा पराभव झाल्यामुळे आज मध्यवर्ती प्रचार कार्यालयातील चिंतन बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले. शिवसेनेचे राम-लक्ष्मण असलेले खा. चंद्रकांत खैरे आणि आ. प्रदीप जैस्वाल यांच्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. जैस्वाल यांनी खा. खैरे यांच्यासह शहरप्रमुख बाळासाहेब थोरात व अन्य पदाधिकाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले, तर खा. खैरे यांनीही जैस्वाल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संघटना कुठेही कमी पडली नाही. पक्षावर आरोप कशाला करायचा, गेल्यावेळी शिवसेना तुमच्या सोबत होती असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. संघटनेतील अनेक घटकांनी काम न केल्यामुळे पराभव पत्करावा लागल्याचा आरोप जैस्वाल यांनी केला. १० नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पराभवाला जबाबदार असलेल्या यंत्रणेची माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगून टाकले. गंगापूर मतदारसंघाच्या पराभवाचा आढावा गेल्या आठवड्यात घेण्यात आला. त्यामध्ये माजी आ. अण्णासाहेब माने आणि पराभूत उमेदवार अंबादास दानवे समर्थकांत हल्लाबोल झाल्यानंतर मध्य मतदारसंघाच्या बैठकीतही वादळी चर्चा झाली.
आ. संदीपान भुमरे, सभागृह नेते किशोर नागरे यांची यावेळी उपस्थिती होती. जैस्वाल म्हणाले, सुरेवाडीतून लोकसभा निवडणुकीत ५ हजार मते मिळतात. विधानसभेला २ हजार मते कसे काय पडतात. तसेच सभागृह नेते नागरे यांच्या वॉर्डातून विधानसभेला २ हजार मते पडतात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वॉर्डातील पक्षाचे मताधिक्य जास्त होते. याचा अर्थ संघटनेने काम केले नाही असाच होतो. कुणी कुणाकडून पैसे घेतले हे मला माहिती आहे. ठाकरे यांना त्याची माहिती देणार आहे. शहर प्रगती आघाडीची यंत्रणा कार्यरत ठेवली असती तर पराभव झाला नसता, असेही ते म्हणाले. बैठकीत
मध्यच्या पदाधिकाऱ्यांनी पराभव कशामुळे झाला, त्याची कारणे विशद केली.