शिवसेनेची सर्व मतदारसंघांत वेगळ्या चुलीची तयारी
By Admin | Updated: July 7, 2014 00:44 IST2014-07-07T00:38:50+5:302014-07-07T00:44:00+5:30
विकास राऊत , औरंगाबाद शिवसेना- भाजपामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची भाषा सुरू झालेली आहे. शिवसेनेने वेगळी चूल मांडण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेची सर्व मतदारसंघांत वेगळ्या चुलीची तयारी
विकास राऊत , औरंगाबाद
शिवसेना- भाजपामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची भाषा सुरू झालेली आहे. शिवसेनेने वेगळी चूल मांडण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत निरीक्षक पाठवून पक्षाच्या स्वबळावरील ताकदीचा आढावा घेण्यासाठी पक्षाने नियोजन केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जिल्ह्यात वाट्याला आलेल्या तीनपैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपाच्या तुलनेत शिवसेनेने जिल्ह्यात मजबूत संघटन निर्माण व्हावे यासाठी माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र ही मोहीम वेगाने सुरू केली आहे.
सेनेने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ६६ पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. युती तुटली आणि स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास उमेदवारांची यादी तात्काळ समोर असावी. यासाठी निरीक्षक, सहनिरीक्षकांची फौज शिवसेनेने तयार केली आहे. ही फौज विधानसभानिहाय स्वबळाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल पक्षनेतृत्वाला सादर करणार आहे.
जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री हे विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे आहेत; परंतु शिवसेनेने त्या मतदारसंघांमध्येही निरीक्षक पाठवून आढावा घेण्याचे ठरविले आहे. ५ जुलै रोजी शिवसेनेने घेतलेल्या मेळाव्यात संपर्क प्रमुख आ. विनोद घोसाळकर, खा. चंदक्रांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सर्व विधानसभा मतदारसंघांत लढण्याचा इशारा दिल्यानंतर आज निरीक्षक नेमून प्रत्यक्षात स्वबळाची तयारीच सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.
उद्देश काय आहे?
या निरीक्षक नेमण्यामागे शिवसेना एका दगडात दोन पक्षी मारणार आहे. भाजपाच्या उरात धडकी आणि सेनेच्या इच्छुकांची गळचेपी करणार आहे. मतदारसंघनिहाय बैठकीतून प्राप्त झालेल्या अहवालातून इच्छुकांचे पत्ते कट केले जाऊ शकतात. पश्चिम, मध्य, कन्नड, वैजापूर हे मतदारसंघ सेनेकडे आहेत. याही मतदारसंघांमध्ये निरीक्षक पाठविले जाणार आहेत. निरीक्षक काय करणार
सेनेचे ६६ पदाधिकाऱ्यांचे पथक गटप्रमुख व केंद्रस्तरावरील शिवसैनिकांच्या बैठका घेतील. त्यांना तालुकास्तरावरील पदाधिकारी सहकार्य करतील. त्या बैठकीत गटप्रमुखांपासून सर्वांच्याच मताचा अहवाल तयार केला जाईल.
तालुके आणि निरीक्षक
पैठण तालुक्यात ९, सोयगावमध्ये ३, सिल्लोड ९, औरंगाबाद पश्चिम ९, औरंगाबाद पूर्व ५, खुलताबाद ४, फुलंब्री ४, कन्नड १०, वैजापूर ८, गंगापूर १० निरीक्षक पाठविण्यात येणार आहेत. तेवढेच सहायक निरीक्षक असणार आहेत. दोन दिवसांत शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघांतील निरीक्षक जाहीर केले जातील, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, न.पा. हद्दीत बैठका
जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांतील २ हजार ५७० मतदान केंद्रांच्या कार्यक्षेत्रात बैठका होतील. जिल्हा परिषदेचे ६० सदस्य, ६ नगरपालिका, अशा ६६ विभागांत १३ ते १५ जुलै रोजी आणि १८ ते २० जुलै रोजी शहरातील ९९ वॉर्डात मतदान केंद्रस्तरावर बैठका होतील. या बैठकीत शाखाप्रमुख, गटप्रमुखांचे मत जाणून घेतले जाईल.