सदस्य नोंदणीतही शिवसेनेची आघाडी

By Admin | Updated: January 16, 2015 01:07 IST2015-01-16T01:02:38+5:302015-01-16T01:07:32+5:30

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीत २ लाख ३३ हजार ९२१ अशी सर्वाधिक मते घेऊन आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेने सदस्य नोंदणीमध्येही इतर पक्षांना धोबीपिछाड दिली आहे.

Shivsena's lead in the membership register | सदस्य नोंदणीतही शिवसेनेची आघाडी

सदस्य नोंदणीतही शिवसेनेची आघाडी


उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीत २ लाख ३३ हजार ९२१ अशी सर्वाधिक मते घेऊन आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेने सदस्य नोंदणीमध्येही इतर पक्षांना धोबीपिछाड दिली आहे. सद्यस्थितीत शिवसेनेची जिल्ह्यात २ लाख ६० हजारांवर नोंदणी झाली आहे. भाजपने यंदा आॅनलाईन नोंदणी सुरु केली असून, मागील वर्षी २३ हजार सदस्य असलेल्या भाजपाने यंदा लाखावर सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला आहे. या तुलनेत काँग्रेसची सदस्य नोंदणीतही पिछेहाट होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे प्रमुख पक्ष म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षासोबतच भाजपानेही स्वतंत्र निवडणूक लढवून जिल्ह्यात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीच्या फडात मते मिळविण्यात भाजपा चौथ्या स्थानावर फेकला गेला असला तरी पक्षाचा पाया ग्रामीण भागात भक्कम करण्यासाठी पक्षाने सदस्य नोंदणीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाच्या वतीने जिल्ह्यात १ डिसेंबरपासून पक्ष बांधणी मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे इतर पक्षांच्या तुलनेत भाजपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र आहे. २०१३ मध्ये जिल्ह्यात पक्षाचे २३ हजार ५०० सदस्य होते. आता ही संख्या ४३ हजार ४०० वर गेली असून, ३१ मार्चपर्यंत १ लाखापेक्षा सदस्य नोंदणीचे पक्षाने उद्दिष्ट ठेवले आहे.
शिवसेनेने लोकसभा निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान पूर्ण केले होते. सेनेचे सद्यस्थितीत २ लाख ६० हजार सदस्य असल्याचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले. गावनिहाय बैठका घेऊन सदस्य नोंदणी करण्यात आलेली असल्याने हे सदस्य सक्रिय असल्याचा दावाही पाटील यांनी केला. काँग्रेस पक्षातर्फे सध्या जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. मात्र सत्तेतून बाहेर फेकल्यामुळे या नोंदणीबाबत पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारीही उदासिन असल्याचे दिसून आले.
सद्यस्थितीत २५ हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाली असून, ७० हजारापर्यंत सदस्य होतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. एका बुथसाठी २५ सदस्य असून, ५० सदस्यांमधून दोन क्रियाशील सदस्य निवडले जातात, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचीही मागील काही दिवसापासून सदस्य नोंदणी सुरु आहे. मात्र विधानसभा निवडणूकीनंतर पक्षाच्या आढावा बैठका झालेल्या नसल्याने सदस्य नोंदणीचा नेमका आकडा पदाधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता, ते ‘नॉट रिचेबल’ होते.
(जि.प्र.)
१९९५ मध्ये भाजपाची सत्ता आली. आणि अवघ्या दोन वर्षात पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सत्ता आल्यानंतर संघटनेकडे कानाडोळा झाल्याने त्यानंतरच्या निवडणुकीतही पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच भाजपाने संघटना मजबूत करण्यावर यंदा विशेष लक्ष दिले आहे. जिल्ह्यात सध्या ४३ हजार ४०० आॅनलाईन सदस्य नोंदणी झाली आहे. पक्षाने दिलेल्या क्रमांकावर मोबाईलवरून मिसकॉल दिल्यानंतर सदर व्यक्तीला सदस्यत्व क्रमांक मिळतो. त्यानंतर आणखी एका नंबरवर त्या व्यक्तीने मेसेज करून संपूर्ण माहिती कळविल्यानंतर हा डाटा प्रदेश भाजपातर्फे मुंबई येथे उभारण्यात आलेल्या कंट्रोलरुममध्ये एकत्रित केला जातो. तेथून सदस्य झालेल्यांची यादी जिल्हा भाजपाकडे येते आणि त्यानंतर संबंधित तालुकाध्यक्षाने पडताळणी केल्यानंतर तो भाजपाचा सदस्य होतो, असे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले.

Web Title: Shivsena's lead in the membership register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.