शिवसेनेच्या दोन सदस्यांवर टांगती तलवार

By Admin | Updated: June 24, 2014 00:10 IST2014-06-24T00:10:15+5:302014-06-24T00:10:54+5:30

हिंगोली : औंढा नागनाथ व सेनगाव ग्रामपंचायतींना राज्य शासनाने नगर पंचायती करण्याचा निर्णय घेतल्याने या दोन्ही ठिकाणच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर

Shivsena's hanging sword | शिवसेनेच्या दोन सदस्यांवर टांगती तलवार

शिवसेनेच्या दोन सदस्यांवर टांगती तलवार

हिंगोली : औंढा नागनाथ व सेनगाव ग्रामपंचायतींना राज्य शासनाने नगर पंचायती करण्याचा निर्णय घेतल्याने या दोन्ही ठिकाणच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर सदस्यत्व संपुष्टात येण्याची टांगती तलवार आहे.
राज्य शासनाने राज्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात औंढा नागनाथ व सेनगाव या दोन ग्रामपंचायती विसर्जित होऊन त्या ठिकाणी नगरपंचायतींची स्थापना होणार आहे. राज्य शासनाने तशी अधिसूचनाही प्रसिद्ध केली असून, यासंदर्भात ३० जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप दाखल करावयाचे आहेत.
दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी नगर पंचायती स्थापन होणार असल्याने या ठिकाणच्या जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात येणार की नाही? याची चर्चा सध्या जिल्ह्यात होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम २५७ च्या भाग २ मध्ये अशा संदर्भातील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये अशा वेळी राज्य शासनाला सदरील जि. प. गटाची पुनर्रचना करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. असे असले तरी या कलमांमध्ये सदस्यत्व रद्द होणार की नाही, याचा मात्र स्पष्ट उल्लेख नाही. काही तज्ज्ञांच्या मते जि. प. सदस्यत्व संपुष्टात येईल, असे सांगितले जाते.
नव्याने स्थापन होणाऱ्या नगर पंचायतीची लोकसंख्या त्या जि. प. गटाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असल्यास तसेच क्षेत्रफळ जास्तीचे असल्यास संबंधित जि. प. गटाच्या सदस्याचे सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते, असेही जाणकारांचे मत आहे. त्यामुळे या प्रकरणी शासन स्तरावरून काय निर्णय होईल, याकडेच जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
सेनगाव जिल्हा परिषद गटाचा विचार केल्यास या गटाचे एकूण ९ हजार ४२३ हेक्टर २३ आर क्षेत्रफळ आहे. त्यापैकी ३ हजार ४४६ हेक्टर १७ आर क्षेत्रफळ नव्याने होणाऱ्या सेनगाव नगरपंचायतीमध्ये येते. उर्वरित ५ हजार ९७७ हेक्टर ४२ आर क्षेत्रफळ शिल्लक राहते.
येथे शिल्लक राहणारे क्षेत्रफळ सेनगावपेक्षा अधिक आहे. तसेच सेनगावची १० हजार ३६५ लोकसंख्या असून, शिल्लक राहणाऱ्या बरडा, तळणी, जांभरूण, सापटगाव, सिनगी नागा, कारेगाव, रिधोरा, भानखेडा, कवरदडी, म्हाळसापूर या जि. प. गटामध्ये येणाऱ्या गावांची लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार केल्यास सेनगावच्या शिवसेनेच्या जि. प. सदस्याचे सदस्यत्व संपुष्टात येणार नसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे औंढा नागनाथ जिल्हा परिषद गटाचे चित्र मात्र वेगळे आहे. या गटाचे एकूण ४ हजार ६८२ हेक्टर ४८ आर क्षेत्रफळ असून, नव्याने होणाऱ्या नगर पंचायतीमध्ये यातील २ हजार ७६४ हेक्टर ६३ आर क्षेत्रफळ समाविष्ठ होते. केवळ १ हजार ९१७ हेक्टर ८६ आर क्षेत्रफळ शिल्लक राहते. तसेच औंढा नागनाथ या गावाची लोकसंख्या १२ हजार १० असून, या जि.प. गटांतर्गत येणाऱ्या दरेगाव, लक्ष्मणनाईक तांडा, सावरखेडा, असोला तर्फे लाख व वाळकी या ग्रामपंचायतींची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा निकष लावल्यास औंढा नागनाथ येथील शिवसेनेच्या जि. प. सदस्याचे सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते, असेही जाणकारांचे मत आहे.
जर राज्य शासनाने जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ कलम २५७ मधील उपकलमांचा आधार घेतल्यास वेगळा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी दोन्ही जिल्हा परिषद गटाच्या सदस्याचे सदस्यत्व संपुष्टात येईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे या दोन्ही सदस्यांवर सदस्यत्व संपुष्टात येण्याची टांगती तलवार आहे. नगर पंचायती अस्तित्वात येण्याच्या प्रक्रियेस आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मधातच विधानसभेच्या निवडणुका असल्याने कदाचित आॅक्टोबरनंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा कचेरीकडे एकही आक्षेप नाही
लोकसंख्या व क्षेत्रफळाचा निकष गृहीत धरल्यास सेनगाव जि.प. गटाच्या सदस्याचे सदस्यत्व वाचणार तर औंढा नागनाथ जि.प. गटाच्या सदस्याचे सदस्यत्व संपुष्टात येणार.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम २५७ च्या तरतूदीत संबंधित सदस्याचे सदस्यत्व संपुष्टात येण्यासंदर्भात संदिग्ध उल्लेख.
सदस्यत्व संपुष्टात आल्यास जि.प.तील राजकारण बदलणार.
सेनगाव व औंढा नागनाथ नगरपंचायतीची अधिसूचना जारी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने यासंदर्भात आक्षेप मागविता आले नव्हते. आता राज्य शासनाने जून महिन्याच्या प्रारंभी यासंदर्भातील आदेश काढून ३० जूनपर्यंत आक्षेप मागविले आहेत. २३ जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही आक्षेप दाखल झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पं.स.सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात येणार
जिल्हा परिषद सदस्यांच्या सदस्यत्वासंदर्भात संदिग्धता असली तरी सेनगाव व औंढा नागनाथ या दोन्ही पंचायत समिती गणाच्या सदस्यांचे सदस्यत्व मात्र संपुष्टात येणार आहे. असे झाल्यास दोन्ही पंचायत समित्यांमधील सत्तेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. औंढा पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ९ तर काँग्रेस- राष्ट्रवादीचे ८ आणि भाजपाचा १ सदस्य आहे. येथे काँगे्रसने सभापतीपद मिळविले आहे. सेनगाव पंचायत समितीत शिवसेनेचे दोनच सदस्य आहेत. येथे राष्ट्रवादीकडे सभापतीपद आहे.

Web Title: Shivsena's hanging sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.