सेलू पालिकेवर शिवसेनेचा मोर्चा
By Admin | Updated: August 3, 2014 00:59 IST2014-08-03T00:23:36+5:302014-08-03T00:59:15+5:30
सेलू : शहरातील प्रभाग तीन मध्ये पाणीपुरवठा होत नसून महेशनगरात नवीन पाईपलाईन बदलून द्यावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने नगर पालिका कार्यालयावर शनिवारी दुपारी पाच वाजता मोर्चा काढून

सेलू पालिकेवर शिवसेनेचा मोर्चा
सेलू : शहरातील प्रभाग तीन मध्ये पाणीपुरवठा होत नसून महेशनगरात नवीन पाईपलाईन बदलून द्यावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने नगर पालिका कार्यालयावर शनिवारी दुपारी पाच वाजता मोर्चा काढून मुख्याधिकारी जगताप यांना धारेवर धरण्यात आले़
शहरातील प्रभाग तीन मधील शिवाजीनगर, विद्यानगर, तेली गल्ली, पांडे गल्ली या भागात नवीन पाईप लाईन ने पाणीपुरवठा करण्यात यावा व शहरात होत असलेला दूषित पाणी पुरवठा बंद करावा या मागण्यांसह श्रीरामजी भांगडिया उद्यानाचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे़ तसेच शनिवारची नगर पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करावी, ऩ प़ तील सत्ताधारी खोटे कामे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवकांनी मोर्चा काढला़ या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता़ नगरपालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पालिका कार्यालयासमोर रिकामे मडके फोडून संताप व्यक्त केला़ मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पाहताच प्रभारी मुख्याधिकारी जगताप यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले़ शहरातील अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़
डॉ़ आंबेडकरनगरमध्ये जाणीवपूर्वक नवीन पाईपलाईन टाकण्यास विलंब करीत असल्यामुळे या नगरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ तर ज्या भागात पाणी सोडण्यात येते ते पाणी गाळमिश्रीत येत आहे. त्यामुळे मोर्र्चातील महिलांनी दूषित पाण्याने भरलेल्या बाटल्या सोबत आणून याबाबतची विचारणा करून मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले़ त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात सेनेचे नगरसेवक संदीप लहाने, मंगलताई कथले, संजय धापसे, संध्या चिटणीस, अन्नपूर्णाताई शेरे, तसेच महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे या बाबीचा जाब विचारला त्यामुळे काही काळ पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते़ या मोर्चात शिवाजीनगर, शेरे गल्ली, पांडे गल्ली, विद्यानगर आदी भागातील महिला सहभागी झाल्या होत्या़ (प्रतिनिधी)
भाजपा पदाधिकाऱ्यांचे निवेदन
शिवसेना नगरसेवकांनी पुढाकार घेवून पालिका प्रशासनाच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात भाजप चे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले़ भाजपच्या वतीने शहरातील वाढीव पाणी पट्टी रद्द करून जुन्या दराने स्वीकारावी, श्रावण महिन्यात उघड्यावरची मांसविक्री व कातडे वाळविणे हे प्रकार बंद करावे व मुख्य रस्त्यावर लावण्यात येणारे हातगाडे हटवून वाहतूक सुरळीत करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, मारवाड गल्लीत रस्त्यावर गतीरोधक बसविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे शहराध्यक्ष नितीन सुरवसे, तालुकाध्यक्ष अशोक खताळ, विश्वास राजवाडकर, विलास लांडे, हर्षल शिंदे, पंकज कुलकर्णी, गोविंद लोया यांनी सादर केले़