शिवसेनेच्या गडावर नाराजीचे सुरुंग !
By Admin | Updated: November 12, 2016 00:54 IST2016-11-12T00:56:45+5:302016-11-12T00:54:14+5:30
उस्मानाबाद उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

शिवसेनेच्या गडावर नाराजीचे सुरुंग !
विशाल सोनटक्के उस्मानाबाद
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या प्रारंभी शिवसेना पक्षश्रेष्ठींनी उपनेतेपद देत प्रा. तानाजी सावंत यांच्या रुपाने जिल्ह्याला नवे नेतृत्व दिले होते. मात्र सेनेच्या अनेक बालेकिल्ल्यात बंडखोरांनी निशाण फडकावित सावंत पॅटर्नला धक्का दिला आहे. भूममध्ये तर सर्वच सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे सेनेवर नामुष्कीची वेळ आली आहे, तर उस्मानाबादेत सेनेच्या माजी नगराध्यक्षांनी बंडाच्या झेंडा हातात घेतला आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या लढतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. आठ नगराध्यक्ष आणि १६६ सदस्यांना निवडून देण्यासाठी आता पालिकांमध्ये लढत रंगणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी शहराबरोबरच ग्रामीण भागातही शिवसेनेची पाळेमुळे रुजलेली आहेत; मात्र हेवेदावे आणि अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसेना पक्षश्रेष्ठींनी पालिका निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वी प्रा. तानाजी सावंत यांची उपनेतेपदी वर्णी लावत सेनेची सूत्रे त्यांच्या हाती सोपविली. सावंत यांनीही शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात निष्ठावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची गर्जना केली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उस्मानाबादेत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून ऐनवेळी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या नाराजीला तोंड फुटले. पर्यायाने युवासेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके आणि राजेंद्र घोडके या तिघांनी नगराध्यक्षासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यातील साळुंके यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सेनेला यश मिळाले असले तरी माजी नगराध्यक्ष घोडके यांची बंडखोरी कायम राहिल्याने सेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.
भूम नगरपालिका अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनेने मोठी तयारी केली होती. युतीसाठीही या ठिकाणी दोन्ही पक्षात बोलणी सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी युतीची बोलणी फिसकटली. प्रारंभी येथे चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात होती; मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी भूम पालिका निवडणुकीबाबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी गंभीर नाहीत, त्यांनी पक्ष म्हणून या निवडणुकीकडे कसलेही लक्ष दिले नाही असा आरोप करीत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भूममध्ये ही निवडणूक आता धनुष्यबाणाविनाच रंगणार असून, शिवसेनेसाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे.
परंडा नगरपालिकेवर मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र सावंत यांची उपनेतेपदी वर्णी लागल्यानंतर शहर शिवसेनेत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि सावंत असे दोन गट दिसून लागले होते. उमेदवारांना एबी फॉर्म देताना सेनेतील ही बेकी पुन्हा प्रकर्षाने पुढे आली. १७ पैकी ४ एबी फॉर्मवर उपनेते सावंत यांनी त्यांच्या निकटवर्तीयांची नावे टाकून ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे फॉर्म सुपूर्द केल्याने या चारही वॉर्डमधून पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोघांनी शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतले असले तरी दोन वॉर्डांमध्ये सेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे परंड्यात यावेळी सर्व १७ जागांवर भाजपने उमेदवार उभे केल्याने सेनेला विजयासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.
कळंब नगरपालिकेत चौरंगी लढत होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. मात्र या ठिकाणीही अंतर्गत गटबाजी खदखदते आहे. माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांचे निकटवर्तीय पांडुरंग कुंभार यांनी तिकीट मिळविण्यात बाजी मारली असली तरी कळंबमधील जिल्हाप्रमुख सुधीर पाटील आणि खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांचा गट कुंभार यांच्या पाठीशी कितपत उभा राहतो, यावरच येथे सेनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.