शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना घातले कांद्याचे हार
By Admin | Updated: October 15, 2016 00:59 IST2016-10-15T00:53:42+5:302016-10-15T00:59:46+5:30
कळंब :शिवसैनिकांनी शुक्रवारी कळंब येथे कृषी अधिकाऱ्यांना कांद्याने गुंफलेल्या हार घालून आपला संताप व्यक्त केला.

शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना घातले कांद्याचे हार
कळंब : तालुक्यातील पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची अस्थिर बाजारभावाच्या काळात सुयोग्य साठवणूक व्हावी यासाठी कृषी विभागाकडील अनुदानीत चाळी उभारल्या. परंतु या कांदा चाळीस अनुदान देण्यास पाच महिने निधीच नव्हता अन् पुढे आला तर दोन महिन्यापासून कृषी विभाग शेतकऱ्यांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी कळंब येथे कृषी अधिकाऱ्यांना कांद्याने गुंफलेल्या हार घालून आपला संताप व्यक्त केला.
कळंब तालुक्यात कांदा लागवडीचे प्रमाण वाढले आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतत अस्थिर बाजारभावाचा किंवा तेजी-मंदीचा सामना करावा लागतो. बहुतांशवेळा अल्पदरामुळे शेतकऱ्यांना आपला उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. अशा कठीण स्थितीत हा कांदा चांगला दर येईपर्यंत ठेवावा तर कांदा हा नाशवंत असल्याने उलटपक्षी दुप्पट नुकसान होते. यामुळे यासाठी योग्य साठवणुकीसाठी अत्याधुनिक कांदा चाळ उभारणे आवश्यक असते. याच अनुषंगाने कृषी विभागाने आपल्या एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कांदा चाळ उभारणीची योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. निधीचा 'तोटा' असतानाही कळंब तालुक्यातील जवळपास ९०० प्रस्तावांना सढळ हाताने कृषी विभागाने पूर्वसंमती दिली. यातील जवळपास ५२५ शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात कृषी विभागाला अनुदान मागणीची देयकेही सादर केली. परंतु निधीच्या कमतरतेमुळे प्रथम टप्प्यात यातील ९० च्या आसपास लोकांना अनुदान देण्यात आले.
उर्वरित लोकांना निधी नसल्याने आजवर रखडावे लागले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेलया शिवसैनिकांनी कन्हेरवाडी येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी तालुका कृषी कार्यालय गाठले. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे कृषी अधिकारी वसवडे यांना युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर बाराते, कन्हेरवाडीचे शाखा प्रमुख विजय कवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून कांद्यानी गुंफलेला हार घालण्यात आला. या आंदोलनात युवा सेना तालुकाप्रमुख सागर बाराते, विजय कवडे, धनंजय मिटकरी, नामदेव गायकवाड, विलास कवडे, अजित मिटकरी, वैभव कवडे, सुदाम मिटकरी, राजेंद्र कवडे, संजय कवडे आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.