'मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव, पण न्यायपालिकेने न्याय दिला'-चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:53 PM2022-09-23T17:53:18+5:302022-09-23T17:54:30+5:30

न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी दिली आहे. या निर्णयाचे चंद्रकांत खैरे यांनी साखर-पेढे वाटून स्वागत केले.

ShivSena Dasara Melava | 'chief minister put a lot of pressure on the officials, but the judiciary gave justice' - Chandrakant Khaire | 'मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव, पण न्यायपालिकेने न्याय दिला'-चंद्रकांत खैरे

'मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव, पण न्यायपालिकेने न्याय दिला'-चंद्रकांत खैरे

googlenewsNext

औरंगाबाद: दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. सर्वांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी दिली आहे. यामुळे राज्यभरात ठाकरे गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला. 'न्यायपालिकेचे धन्यवाद, त्यांनी आमच्यासारख्या शिवसैनिकांचा मान राखला आणि न्याय दिला,' अशा शब्दात खैरेंनी आनंद व्यक्त केला.

'अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला'
न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना खैरे म्हणाले की, 'शिवसेनेने शिवतीर्थासाठी पहिला अर्ज दिला होता, तेव्हाच त्यांनी मान्य करायला हवा होता. सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला होता. मला एका आधिकाऱ्याने सांगितले की, रोज मंत्रालयातून फोन यायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज आयुक्तांना फोन करायचे आणि परवानगी देऊ नका, असे सांगायचे. ही मराठी माणसांची-हिंदूंची शिवसेना आहे. शिवसैनिकांना आणि उद्धव साहेबांना अजून किती त्रास देणार? शिवसेनेला त्रास देण्याचे काम शिंदे गटाने केले, देव त्यांना कधीच माफ करणार नाही,' असं खैरे म्हणाले.

'त्यांच्या मेळाव्यात कोणी जाणार नाही'
यावळी पत्रकारांनी विचारले की, शिंदे गटदेखील दसरा मेळावा घेणार आहे. त्यावर बोलताना खैरे म्हणाले की, 'ते मोठा मेळावा घेतील, त्यांच्याकडे खूप पैसा आहे. दहा हजार बसेस-रेल्वे केल्याचे ते सांगत आहेत, या सर्व कुठून केल्या? खोके मिळाले म्हणूनच केल्या ना. गेल्या वेळेस इथल्या एका बंडखोर आमदाराने 35-35 बसेस नेल्या होत्या, त्यात कोणीही बसायला तयार नव्हतं. आताही त्यांच्या बसेसमधून कोणी जाणार नाही. आमच्या मेळाव्याला संपूर्ण मैदान भरणार, मराठवाड्यातील प्रत्येक शिवसैनिक स्वखर्चाने मेळाव्याला येणार,' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Web Title: ShivSena Dasara Melava | 'chief minister put a lot of pressure on the officials, but the judiciary gave justice' - Chandrakant Khaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.