टोपेंच्या किल्ल्यास शिवसेनेचा सुरूंग!

By Admin | Updated: May 17, 2014 00:20 IST2014-05-16T23:02:10+5:302014-05-17T00:20:30+5:30

शेषराव वायाळ , परतूरपाठोपाठ पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्‍या घनसावंगीनेही यावेळी शिवसेनेस मोठे मताधिक्य दिल्याने काँग्रेस आघाडीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Shivsena daranga! | टोपेंच्या किल्ल्यास शिवसेनेचा सुरूंग!

टोपेंच्या किल्ल्यास शिवसेनेचा सुरूंग!

 शेषराव वायाळ , परतूर प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेस मोठे मताधिक्य दिलेल्या परतूर विधानसभा मतदारसंघापाठोपाठ पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्‍या घनसावंगीनेही यावेळी शिवसेनेस मोठे मताधिक्य दिल्याने काँग्रेस आघाडीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत निवडून आलेले खासदार भलेही पक्ष सोडून गेले तरीही या मतदारसंघाने शिवसेनेच्या उमेदवारास कायम मताधिक्य देण्याचा धर्म सोडला नाही. वास्तविकता गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी या मतदारसंघांतर्गत राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. गेल्या निवडणुकीत आ. सुरेश जेथलिया हे शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. विशेषत: उमेदवारी आणण्यापासून ते विजयाचेही जेथलिया शिल्पकार होते. मात्र, यावेळी काँग्रेसशी संलग्न असणार्‍या जेथलियांनी आघाडीचा धर्म पाळला. मात्र, उपयोग झाला नाही. सर्वसामान्य मतदारांनी बदललेल्या राजकीय समीकरणांकडे साफ दुर्लक्ष करीत, शिवसेनेमागे भक्कम समर्थन उभे केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे हे स्वकीय व मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यातच दंग होते. अथक् प्रयत्न करूनही भांबळेंना यश पदरी पडले नाही. वास्तविकता भांबळे यांना मंठा भागातून मोठ्या मतांची अपेक्षा होती. नाते-गोते व आप्तांवरच भिस्त होती. बदललेल्या समीकरणांचासुद्धा मोठा फायदा होईल, अशी आशा भांबळे बाळगून होते. परंतु, या भांबळेंना या भागाने कौल दिला नाही. किंवा बरोबरीतपर्यंतसुद्धा आणले नाही. ग्रामीण भागात आ. जाधव यांना जोरदार साथ दिली. वास्तविकता या मतदारसंघात लढत तोडीची वाटली. विजयाची खात्री ठामपणे कोणीच देऊ शकणार नाही, असे चित्र होते. पण मोदी लाटेवर जाधव हे स्वार झाले. भांबळे घायाळ झाले. घनसावंगीत शिवसेनेने मारली बाजी गेल्या निवडणुकीत घनसावंगीतून राष्ट्रवादीस मोठे मताधिक्य मिळाले होते. पालकमंत्री टोपे यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कपणे राहील, असे अपेक्षित होते. भांबळे यांची संपूर्ण दारोमदार टोपे यांच्यावरच पूर्णत: अवलंबून होती. या निवडणुकीत कुठेही दगाफटका होऊ नये म्हणून टोपे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, सर्वसामान्य मतदारांनी टोपे यांचे ऐकले नाही. या मतदारसंघांतर्गत शहरी व ग्रामीण भाग पूर्णत: शिवसेनेच्या पाठीशी राहिला, असे सकृतदर्शनी चित्र समोर आले आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे टोपेंना धक्काच मानला जात आहे. जिंतूर पाठोपाठ घनसावंगीतुनच भांबळेंना मोठी ‘लीड’ अपेक्षित होती. ती अपेक्षा टोपेंच्या प्रभावक्षेत्रात फोल ठरली, शिवसेनेचे बाजी मारली. या भागातील शिवसेनेच्या नेतृत्वाचे हे यश आहे.

Web Title: Shivsena daranga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.