शिवसेनेची उमेदवार यादी तयार, भाजपाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 00:55 IST2017-01-28T00:53:13+5:302017-01-28T00:55:15+5:30
जालना : शिवेसना आणि भाजपाची युती तुटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या

शिवसेनेची उमेदवार यादी तयार, भाजपाचे काय?
जालना : शिवेसना आणि भाजपाची युती तुटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या असून, शिवसेनेने ५६ गटांतील उमेदवारांची यादी निश्चित केली असून, भाजपा मात्र आस्ते कदम टाकत रविवारी वा सोमवारी यादी करण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अद्याप बोलणीच सुरू असल्याने आघाडीचा निर्णयही अधांतरीच आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्याचे जाहीर केल्याने जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी एकाही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेल नाही. जिल्हा परिषदेच्या ५६ सर्कलसाठी ५८५ इच्छुकांनी, तर पंचायत समित्यांसाठी ११८५ इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी सांगितले. त्यामुळे भाजपाकडे उमेदवारांची वानवा नसून सर्व बाबत सक्षम असलेल्या इच्छुकांनाच पक्षा उमेदवारी देईल, असे संकेत त्यांनी दिले. असे असले तरी पक्षश्रेष्ठी यावर ंअतिम निर्णय घेणार असून, रविवारी वा सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची उत्तम फळी असून, जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठीच्या इच्छुकांची यादी तयार करण्यात आली आहे. ग्रामीण भागात रुजलेला पक्ष असून, नोटाबंदी आणि इतर निर्णयांमुळे सामान्यांमध्ये नाराजी आहे. तसेच जात, पैसा आणि उमेदवार हे फॅक्टर यशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व बाबी अनुकूल असतील तर जिल्हा परिषदेवर शिवसेनेची निर्विवादपणे सत्ता येईल, असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर आणि ए.जे. बोराडे यांनी लोकमतशी बोलताना केला. (प्रतिनिधी)