शिवसेनेचे उमरग्यात धरणे आंदोलन

By Admin | Updated: December 18, 2014 00:36 IST2014-12-18T00:24:03+5:302014-12-18T00:36:01+5:30

उमरगा : विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या एका रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करावी

Shiv Sena's Umargate dharana movement | शिवसेनेचे उमरग्यात धरणे आंदोलन

शिवसेनेचे उमरग्यात धरणे आंदोलन


उमरगा : विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या एका रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करावी व मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाविरण कार्यालयासमोर बुधवारी तब्बल चार तास धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील कोरेगाववाडी येथील मूळ रहिवाशी असलेले तुकाराम ज्ञानेश्वर हंडे (वय ३५) हे उमरगा येथील आरोग्य नगरी मध्ये वीज वितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या मामाकडे वास्तव्यास होते. मामाजवळ राहून मयत तुकाराम याने मीटर बसविणे, कनेक्शन देणे, फ्यूज टाकणे, लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करणे, लाईट बिले देणे आदी कामे करीत असे. मंगळवारी सायंकाळी येथील बँक कॉलनी भागात फ्यूज गेल्याचा कॉल आला. फ्यूज बसविण्यासाठी गेल्यानंतर तुकाराम यास विजेचा धक्का लागला. यात विजेच्या खांबावरून पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याप्रकरणी हांडे यांच्या कुटुंबियाचे विज वितरण कंपनीने पुनर्वसन करावे, अशी मागणी शिवसेनेने केली. जिल्हा उपप्रमुख बसवराज वरनाळे, तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी यांनी तहसीलदारांना वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी एका निवेदनाद्वारे केली. सदर मागण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. तुळज़ापूर येथील अतिरक्ति कार्यकारी अभियंता पी. एन. विडोळकर, खा. रविंद्र गायकवाड, तहसीलदार उत्तमराव सबनीस, पोनि सुनील निकाळजे, पोऊनि विलास गोबाडे, मुख्याधिकारी डॉ. संतोष ठेंगळे आदी आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अखेर खासदार व पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हांडे यांच्या पत्नीला वीज वितरणच्या सेवेत रुजू करून घेऊ, असे आश्वासन अधिकाऱ्याकडून मिळाल्यानंतर मयत हांडे यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Shiv Sena's Umargate dharana movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.