शिवसेनेची मदत लाख मोलाची
By Admin | Updated: November 29, 2015 23:15 IST2015-11-29T23:06:32+5:302015-11-29T23:15:41+5:30
जालना : दुष्काळी परिस्थितीत शेतकरी होळपळत असताना शासनाने मदतीला धावणे गरजेचे होते. मायबाप सरकार हे गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मदतीला धावेल,

शिवसेनेची मदत लाख मोलाची
जालना : दुष्काळी परिस्थितीत शेतकरी होळपळत असताना शासनाने मदतीला धावणे गरजेचे होते. मायबाप सरकार हे गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मदतीला धावेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. शासनाअगोदरच शिवसेना मदतीला धावून आली. त्यांनी केलेली ही मदत आज आमच्यासाठी लाख मोलाची मदत ठरली, अशी भावना असंख्य अल्पभूधारक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
आ. अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील १ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील प्रत्येकी दोन शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मदत वाटप करण्यात आली.
शिवसेनेने जिल्ह्यातील एक हजार दुष्काळग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत दिली. त्यातील काही लाभधारक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया लोकमतने जाणून घेतल्या. त्यात काही शेतकऱ्यांनी शासनावर रोषही व्यक्त केला आहे. तर काही महिला शेतकऱ्यांना भावना व्यक्त करताना गहीवरून आले होते. यावेळी त्यांना आपले आश्रू आवरता आले नाहीत.
शेतकऱ्यांनी महावितरणच्या काराभारावरही राग व्यक्त केला. रब्बी हंगामात पिकांना पाण्याची गरज आहे. काही विहिरींना पाणी असतानाही विजेअभावी देता येत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)
जेमतेम एक एकर शेती त्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे दहा वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. दोन मुले आणि दोन मुली यांच्याकडे पाहून मेहनत आणि जिद्दीने संसाराचा गाडा ओढत दोन मुलींचे लग्न केले. मुलाचे शिक्षण केले. मोठ्या मुलाने ८ वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते बंद करून कामधंदा करून घराला हातभार लावत आहे. लहान मुलगा १२ वीचे शिक्षण घेत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून मिळालेली मदतही लाखमोलाची ठरणारी आहे.
- चंद्रभागा रामदास इंगळे, बोरखेडी, ता. जालना
आपल्याला तीन एकर शेती आहे. मागील तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नापिकी होते. यावर्षी खरीप हंगामाचे जेमतेम उत्पन्न झाले. त्यावर केलेला खर्चही निघाला नाही. आता रबीची पेरणी झालेली असून, शिवसेनेकडून मिळालेली मदत ही रब्बी हंगामातील पिकांना औषध फवारणी व अन्य कामांसाठी महत्वाची ठरणारी आहे. शासनाकडून देण्यात येणारी दुष्काळी मदत ही तोकडी आहे. त्यातही मदत मिळविण्यासाठी सरकारी बाबूंच्या घराच्या उंबरठे तसेच शासकीय कार्यालयांवर खेटे घालावे लागत आहेत. त्यामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आहे. त्याउलट आ. अर्जुन खोतकर यांनी माझ्या सारख्या शेकडो अल्पभूधारक शेतकऱ्यांना संकटकाळी मदत करून शेतकऱ्यांना आर्र्थिक संकटातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.
- श्याम पवार, वखारी वडगाव , ता. जालना