परंडा तालुक्यात शिवसेनेला ‘दे धक्का’
By Admin | Updated: February 8, 2017 00:19 IST2017-02-08T00:14:11+5:302017-02-08T00:19:30+5:30
परंडा : उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या क्षणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आपापसात समझोता करीत, शिवसेनेला ‘दे धक्का’ दिला आहे

परंडा तालुक्यात शिवसेनेला ‘दे धक्का’
परंडा : उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या क्षणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आपापसात समझोता करीत, शिवसेनेला ‘दे धक्का’ दिला आहे. लोणी गटातील पंचायत समितीसाठीच्या सेनेच्या अधिकृत उमेदवारांनी नाट्यमयरित्या उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेचा धनुष्यबान गोठावला. एवढेच नव्हे तर भाजपानेही गटगणाचे कमळ चिन्हावरील अधिकृत उमेदवार मागे घेऊन लोणी गटगणातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेत तालुक्यात नवीन राजकीय समिकरणाला जन्म घातला आहे. याचा मोठा फटका शिवसेना पर्यायाने प्रा. तानाजी सावंत गटाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्वभुमीवर तिकीटवाटपाची सर्व सुत्रे आपल्याच हातामध्ये असावीत अशी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेना पक्षश्रेष्ठीकडे विनंती केली होती. मात्र प्रत्यक्ष तिकीट वाटपावेळी माजी आमदार पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना डावलल्याने पाटील नाराज झाले होते. लोणी गटातून पाटील यांच्या विरोधाकडे कानाडोळा करीत शिवसेनेने अण्णासाहेब जाधव यांच्या पत्नी अर्चना जाधव यांना उमेदवारी दिल्याने आगीत तेल ओतले गेले. कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाच्या रेट्याने पाटील द्विधा मनस्थीमध्ये सापडले होते. मंगळवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा तास शिल्लक असताना आमदार सुजितसिंह ठाकुर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे, शंकर इतापे, अॅड सुभाष मोरे यांच्यामध्ये राजकीय खल होऊन नवीन समिकरण उदयास आले. समझोत्यानुसार शिवसेनेचा लोणी गटाच्या उमेदवार अर्चना जाधव यांचा उमेदवारी अर्ज वगळता भाजपा सेनेच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचे ठरले. त्यानुसार शिवसेनेचे लोणी गणाचे उमेदवार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील, भाजपा उमेदवार किरण शिंदे, शिवसेनेचे वडणेर गणाचे उमेदवार रोहीदास भोसले भाजपा उमेदवार प्रकाश ओव्हाळ यांनी ठरल्याप्रमाणे अर्ज मागे घेतले. भाजपाच्या लोणी गटाच्या उमेदवार ज्योती टोंपे यांनीही अर्जही मागे घेतला.
आजी-माजी आमदारांनी आता लोणी गट गण अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. समझोत्यानुसार लोणी गटातून पंचायत समितीच्या विद्यमान सभापती काशीबाई इतापे जिल्हा परिषद लोणी गटातून अपक्ष म्हणून लढणार असून लोणी गणातून सुखदेव टोंपे, वडणेर गणातून हनुमंत गायकवाड अपक्ष उमेदवार राहणार आहेत. आमदार ठाकुर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यामध्ये झालेल्या राजकीय समझोत्याचे पडसाद इतर गटगणांमध्येही उमटणार असून याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसण्याची व त्याचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.