जालन्यात शिवसेना भाजपवर वरचढ...!
By Admin | Updated: March 22, 2017 00:39 IST2017-03-22T00:38:44+5:302017-03-22T00:39:31+5:30
जालना : जिल्हा परिषदेत सर्वात कमी १४ जागा असतानाही अध्यक्ष पद खेचून आणण्याची किमया शिवसेनेने मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साधली.

जालन्यात शिवसेना भाजपवर वरचढ...!
जालना : जिल्हा परिषदेत सर्वात कमी १४ जागा असतानाही अध्यक्ष पद खेचून आणण्याची किमया शिवसेनेने मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साधली. कॉँग्रेस, राष्टवादी कॉँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी होती. आघाडीला १८ जागा मिळाल्या, तर दोन अपक्ष निवडून आले. पैकी एकाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या अपक्षानेही शिवसेनेला मतदान केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनिरुध्द खोतकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सतीश टोपे हे विराजमान झाले. कमी जागा जिंकूनही सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपावर शिवसेना वरचढ ठरली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. शिवसेनेतर्फे अनिरुध्द खोतकर यांनी तर भाजपातर्फे अवधूत खडके यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. यात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. खोतकर यांच्या बाजूने ३४ तर खडके यांच्यासाठी २२ जणांनी हात उंचावून मतदान केले. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सतीश टोपे यांच्याबाजूने ३३ तर शिवसेना बंडखोर महेंद्र पवार यांना २३ जणांनी मतदान केले. निवडणूक निवडणूक अधिकारी खपले यांनी अध्यक्षपदी अनिरुध्द खोतकर तर उपाध्यक्षपदी सतीश टोपे विजयी झाल्याचे जाहीर केले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागून होते. भाजपाच्या सर्वाधिक म्हणजेच २२ जागा निवडून आल्या. तर शिवसेना १४, राष्ट्रवादी काँग्रेस १३, काँग्रेस ५ आणि अपक्ष २ जागांवर निवडून आले होते. बहुमतापासून सात जागा दूर असलेल्या भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक पातळीवरील राजकीय गणितांमुळे भाजपा बहुमत मिळविणे अवघड गेले. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भविष्यातील राजकीय गणिते ओळखत समीकरणे जुळविली. भाजपाची जिल्ह्यातील घौडदौड रोखण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले. निवड जाहीर होताच एकच जल्लोष करण्यात आला. (प्रतिनिधी)