शिवसेनेच्या खासदारांनी केली दुष्काळी भागाची पाहणी
By Admin | Updated: August 26, 2014 01:51 IST2014-08-26T00:50:17+5:302014-08-26T01:51:52+5:30
परभणी: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा.बंडू जाधव व नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या पथकाने सोमवारी

शिवसेनेच्या खासदारांनी केली दुष्काळी भागाची पाहणी
परभणी: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा.बंडू जाधव व नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या पथकाने सोमवारी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाची पाहणी केली.
मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण मराठवाड्यात पक्षाच्या विविध खासदारांची नियुक्ती केली आहे. परभणी जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील नऊही तालुके टंचाईग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची नाशिकचे खा.हेमंत गोडसे व खा. बंडू जाधव हे सोमवारपासून पाहणी करीत आहेत. सोमवारी या खासदारद्वयांनी पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यातील गावांची पाहणी केली. त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील ममदापूर, सुकी, गणपूर, कान्हेगाव, खुजडा, फुकटगाव, एकरुखा, खांबेगाव, ताडकळस, धानोरा काळे, मालेवाडी या गावांचा समावेश आहे. या पाहणीत सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिके वाळून गेल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी यावेळी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. जनावरांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्याचे त्यांना सांगितले. यावेळी या खासदारद्वयांनी याबाबतचा अहवाल पक्षप्रमुखांना सादर केला जाणार असल्याचे सांगितले. सोमवारी पोळा सण असतानाही दुष्काळामुळे या सणावर विरजन पडल्याचे दिसून आले. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केलाच नाही. अनेक गावात केवळ औपचारिकता पार पाडली, असे या खासदारद्वयांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, नंदू पाटील अवचार, बाळासाहेब घाटोळ, बालाजी वैद्य, बंटी कदम, प्रकाश कऱ्हाळे, माणिक हजारे आदींची उपस्थिती होती.