शिवसेनेला झटका; राष्ट्रवादीला दिलासा!

By Admin | Updated: November 3, 2016 23:53 IST2016-11-03T23:49:28+5:302016-11-03T23:53:30+5:30

उस्मानाबाद : नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी झाली.

Shiv Sena jolt; NCP's relief! | शिवसेनेला झटका; राष्ट्रवादीला दिलासा!

शिवसेनेला झटका; राष्ट्रवादीला दिलासा!

उस्मानाबाद : नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी झाली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार विशाल साखरे आणि राष्ट्रवादीचे युवराज नळे यांनी परस्पराविरूद्ध आक्षेप दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी सुनावणी घेवून गुरूवारी निर्णय दिला. त्यानुसार साखरे यांनी शिवसेनेकडून दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. तर नळे यांच्याविरूद्धचा आक्षेप फेटाळून लावला. त्यामुळे सदरील निर्णय नळे यांना पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेलसला दिलासादायक असून साखरे यांना शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युवराज नळे यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेचे अ‍ॅड. विशाल साखरे यांनी आक्षेप घेतला होता. नळे यांनी जानेवारी २०१० मध्ये नगर परिषदेसाठी जेसीबी यंत्र पुरविले होते. कंत्राटदार म्हणून केलेल्या कामाचे ८७ हजार १९७ रूपये एवढे बिल झाले होते. त्यापैकी ५० हजार रूपये स्वीकारले असून उर्वरित बिलाची रक्कम ३७ हजार १९७ रूपये करारनाम्यानुसार अद्याप देणे बाकी आहे. त्यामुळे नळे हे पालिकेचे कंत्राटदार असून ते निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत, अशा स्वरूपाचा आक्षेप घेतला होता. असे असतानाच नळे यांनीही अ‍ॅड. साखरे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविला होता. एका जागेसाठी एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करणे अपेक्षित असतानाही, त्यांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे साखरे यांचा शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला पाचवा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती केली होती.
दरम्यान, दोन्ही आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी बुधवारी सायंकाळी सुनावणी घेतली. जवळपास एक ते दीड तास ही सुनावणी प्रक्रिया चालली. सदरील सुनावणीच्या अनुषंगाने निऱ्हाळी यांनी गुरूवारी निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार युवराज नळे यांचा आक्षेप मंजूर करीत अ‍ॅड. साखरे यांचा शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे साखरे यांना तुर्तास तरी अपक्ष अथवा पुरस्कृत म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार आहे. तर दुसरीकडे अ‍ॅड. साखरे यांनी नळे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. नळे यांनी जेसीबी पुरवठा केलेल्या कामाची उर्वरित रक्कम देण्यात येवू नये, असे पालिकेला कळविले आहे. तसेच नगर परिषदेकडूनही काम अपूर्ण असल्याबद्दल अथवा करारनामा अस्तित्वात असल्याबाबत अर्जाचे उत्तरही कळविलेले नाही. त्यामुळे सदरील व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगत नळे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला. या निर्णयामुळे नळे यांना दिलासा मिळाला आहे. तर साखरे यांच्यासाठी हा निर्णय एकप्रकारे धक्का मानला जात आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena jolt; NCP's relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.