शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी-खोतकर
By Admin | Updated: March 15, 2015 00:36 IST2015-03-15T00:22:47+5:302015-03-15T00:36:05+5:30
जालना : शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राज्यात भाजपा, सेनेला आपला कौल दिला. मात्र गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालेले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारकडून पाहिजे

शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी-खोतकर
जालना : शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राज्यात भाजपा, सेनेला आपला कौल दिला. मात्र गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालेले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारकडून पाहिजे तशी मदत अद्यापही होत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शेतकऱ्यांसोबतच असल्याची भूमिका यापुर्वीही मांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी वेळप्रसंगी लढा देऊ, असे प्रतिपादन आ. अर्जुनराव खोतकर यांनी शनिवारी येथे केले.
विधानसभा अधिवेशनात गुरूवारी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल जालना परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आ. खोतकर यांचा त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आ. खोतकर पुढे म्हणाले की, जागतिक बाजारपेठेशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही. मात्र हाच मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारकडून मदतीचा हात आखडता घेतला जातो. सरकारचे जे चुकते, तेच आपण विधानसभेच्या सभागृहात बोललो. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे, दुधाचे भाव ठरविणारे सरकार कोण? असा सवालही आपण केल्याचे खोतकर यांनी सांगितले.
यावेळी जि.प. सभापती ए.जे. बोराडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकारला दखल घ्यावीच लागेल असे सांगितले. रघुनाथ गोल्डे, माधवराव टकले यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, भानुदास घुगे, जगन्नाथ काकडे, संतोष मोहिते, बाबूराव शिंदे, दिनेश फलके, हरिहर शिंदे आदींची उपस्थिती होती.