शिवसेना, भाजपचे एकला चलो रे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:54 IST2017-09-13T00:54:46+5:302017-09-13T00:54:46+5:30
स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे.

शिवसेना, भाजपचे एकला चलो रे...!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ग्रामपंचायत हा सत्तेतील शेवटचा दुवा. या सत्तेतून जनाधार वाढवत आपली व्होटबँक तयार करण्याचा प्रयत्न होत असतो. ज्या पक्षाच्या ताब्यात अधिक ग्रामपंचायती, तो पक्ष प्रबळ मानला जातो. हेच सूत्र अवलंबत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठका घेत ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या काळात आॅक्टोबर हीटबरोबरच राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरील ग्रामपंचायतींचे परावलंबित्व कमी करत विकास कामांचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. म्हणूनच शेवटच्या स्तरावरील सत्ता आपल्याकडेच असावी, असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. त्यानुसार भाजपने बैठका घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत. निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार करीत अधिकाधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे उद्दिष्ट पक्षाच्या नेत्यांनी ठेवले आहे.
गत काही महिन्यांत भाजपने पक्षविस्तार करत कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला असून, ग्रामीण भागात आपली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, माजी आ. अरविंद चव्हाण, जि.प.सदस्य राहुल लोणीकर यांनी ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून, ग्रामीण भागात पक्ष रुजविण्याची ही नामी संधी साधण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे.
किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. जालन्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत नेत्यांनी तशी भूमिका जाहीर केली आहे. पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून, ग्रामीण भागात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली असून, शिवसैनिकांना ‘चार्ज’ केले जात आहे.
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिवाजी चोथे, डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे यांनी ग्रामीण भागात बैठका घेऊन राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढत शिवसेना नेत्यांनी भाजपला कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना आखली आहे.
आपापले पारंपरिक गड राखण्यासोबत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांचे गड कायम राहतात की याला सुरुंग लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोणत्या पक्षाला ‘आॅक्टोबर हीट’ चा फटका बसतो, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.