शिवसंग्रामला पाहिजे औरंगाबादेतील मतदारसंघ
By Admin | Updated: August 9, 2014 00:55 IST2014-08-09T00:40:21+5:302014-08-09T00:55:27+5:30
शिवसंग्रामला पाहिजे औरंगाबादेतील मतदारसंघ

शिवसंग्रामला पाहिजे औरंगाबादेतील मतदारसंघ
औरंगाबाद : शिवसंग्राम संघटनेचे आता पक्षात रुपांतर केले असून महायुतीत हा घटक पक्ष आहे. सर्व जण एकत्रितपणे काम करणार असून विधानसभा निवडणुकीनिमित्त महायुतीच्या जागा वाटपात शिवसंग्रामही सहभागी आहे. त्यामुळे जागा मिळणार आहेत. यामध्ये औरंगाबादमध्येही जागा मागितल्या आहेत. शहर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी जागा मागितल्या आहेत. येथे एक तरी जागा शिवसंग्रामला मिळेलच, असे शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी सांगितले.
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शुक्रवारी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. तानाजी शिंदे, विभागीय सरचिटणीस वामन राऊत, भारतीय किसान मोर्चाचे कैलास सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद तांबे, सलीम पटेल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. मेटे म्हणाले, महायुतीच्या सर्व घटक पक्षांशी विचारविनिमय झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसंग्रामचा आमदार विधानसभेत जाईल. ज्या गोष्टीसाठी झगडत होतो, त्या संघर्षाला आलेले यश हे जनतेचे आहे. मराठा आरक्षणाची अर्धी लढाई जिंकली असून पुढील लढाईसाठी सज्ज आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. मेटे यांनी यावेळी केली. प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी औरंगाबाद मध्य, गंगापूर आणि पैठण हे विधानसभा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सोडवून घेण्याची मागणी केली.