परभणीत दारू दुकानावर शिवसैनिकांचा हल्लाबोल

By Admin | Updated: July 13, 2017 00:33 IST2017-07-13T00:30:39+5:302017-07-13T00:33:41+5:30

परभणी : नागरी वस्तीत सुरू केलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी १२ जुलै रोजी शिवसैनिकांनी दुकानावर हल्लाबोल केला़

Shiv Sainik attack on parbhani liquor shop | परभणीत दारू दुकानावर शिवसैनिकांचा हल्लाबोल

परभणीत दारू दुकानावर शिवसैनिकांचा हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नागरी वस्तीत सुरू केलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी १२ जुलै रोजी शिवसैनिकांनी दुकानावर हल्लाबोल केला़ मात्र तत्पूर्वीच दुकानदाराने तेथून पळ काढल्याचा प्रकार दुपारी २़३० वाजेच्या सुमारास घडला़
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारुची दुकाने हटविण्यात आली आहेत़ त्यामुळे या दुकानमालकांनी नागरी वसाहतींमध्ये दुकान सुरू करण्याचा चंग बांधला आहे़ शहरातील कारेगाव रोड भागातील लोकमान्यनगरजवळ काही दिवसांपूर्वी दारुचे दुकान सुरू करण्यात आले़ या भागातील नागरिकांचा विरोध असतानाही हे दुकान सुरू झाले़ या परिसरात मुलींची शाळा, जिल्हा उद्योग केंद्र, खाजगी शिकवण्या, न्यायाधिशांची निवासस्थाने आणि नागरी वसाहत आहे़ त्यामुळे महिला, युवतींची नेहमी या रस्त्यावर वर्दळ असते़ या दुकानाचा त्रास नागरिकांना होणार असल्याने नागरिकांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांची भेट घेऊन दुकान बंद करण्याची मागणी केली होती़ या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुकान बंद करण्यासाठी हे आंदोलन केले़
शिवसैनिक दुकानासमोर आंदोलन करणार असल्याची कुजबुज लागताच दुपारी २़३० वाजण्याच्या सुमारास दुकानाचे शटर ओढून चालकाने पळ काढला़ त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी दुकानासमोर वाढविलेले अतिक्रमण, झाडांच्या कुंड्या काढून फेकल्या़ त्यानंतर शिवसैनिकांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व दारु दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली़ जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, महिला आघाडीच्या कुसूमताई पिल्लेवाड, उषाताई मुंडे, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, नगरसेवक प्रशास ठाकूर, मारोती तिथे, अजय पेदापल्ली, राहुल खटींग, अमोल गायकवाड, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, तुषार चोभारकर, शेख असलम, अक्षय रेंगे, गणेश मुळे, बाबू फुलपगार, मकरंद कुलकर्णी, प्रशांत गारुडी यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते़

Web Title: Shiv Sainik attack on parbhani liquor shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.