दुष्काळासाठी शिवकालीन व्यवस्थापन दिशादर्शक
By Admin | Updated: September 6, 2015 23:59 IST2015-09-06T23:52:23+5:302015-09-06T23:59:04+5:30
लातूर : स्वराज्यासाठी रणांगणावर मावळ्यांसह लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालविले़ शेती, पाणी,

दुष्काळासाठी शिवकालीन व्यवस्थापन दिशादर्शक
लातूर : स्वराज्यासाठी रणांगणावर मावळ्यांसह लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालविले़ शेती, पाणी, दुष्काळ इत्यादी बाबींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करुन त्याचे उत्तम व्यवस्थापन केले़ दुष्काळ निवारणासाठी त्यांचे व्यवस्थापन आजही दिशादर्शक आहे़ जलयुक्त शिवार अभियानाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाणी व्यवस्थापन कौशल्यातून घेतली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले़
अहमदपूर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या भूमीपूजन कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते़ मंचावर जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, आ़ विनायकराव पाटील, आ़संभाजी पाटील निलंगेकर, आ़सुधाकर भालेराव, आ़ प्रताप पाटील चिकलीकर, नगराध्यक्षा ललिता पुणे, माजी आग़ोविंद केंद्रे, बब्रुवान खंदाडे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, भाजपाचे प्रदेश सचिव दिलीपराव देशमुख, किसान मोर्चाचे अशोक केंद्रे, पं़स़चे सभापती अॅड़ आऱडी़ शेळके, बाजार समितीचे सभापती अॅड़ भारत चामे, माजी आ़ राम गुंडीले, दलित मित्र रफिक अहमद यांची उपस्थिती होती़ यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणावर लढण्याचा आणि रयतेसाठी राज्य करण्याचा आदर्श आपल्याकडे उभा केला आहे़ काळाच्या पुढे जाऊन ते विचार करीत होते़ त्यांनी दाखविलेली समयसुचकता, त्यांचे नियोजन, प्रशासकीय कौशल्य, व्यवस्थापन शास्त्र शिकण्यासारखे आहे़ जलयुक्त शिवार योजना ही संकल्पना त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावरच आधारीत आहे़ राज्यात सध्या दुष्काळ आहे़ मागील आठवड्यात सलग तीन दिवस मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील ३१ गावांचा दौरा करुन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली़ शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले़ टंचाईचा मुकाबला करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि मजुरांना काम देण्याचे नियोजन शासनाने केले आहे़ जगाला अन्न, धान्य उपलब्ध करुन देणारा बळीराजा उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे़ तसेच राजीव गांधी जिवनदायी योजनेतून शेतकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे़ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शुल्कातून माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ तसेच जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा मिळावा, यासाठी अटी शिथील करुन चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे़ प्रास्ताविक डॉ़ सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी केले़ सुत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी केले तर आभार दादासाहेब देशमुख यांनी मानले़ यावेळी आ़विनायकराव पाटील, पंचायतराज समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांचेही समयोचित भाषण झाले़