शिरूर तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ

By Admin | Updated: September 11, 2014 00:23 IST2014-09-11T00:16:18+5:302014-09-11T00:23:00+5:30

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे.

In the Shirur taluka, the randukar | शिरूर तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ

शिरूर तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे. वन विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने तोंडचा घास पळवून नेल्या सारखी स्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे.
गणपतीच्या आगमनापासून तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्या व ओढ्यांना पाणी आले होते. जागोजागी पाणीच पाणी साठल्याचे चित्र आजही तालुक्यात पहावयास मिळत आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरे कळपाने येऊन पिके उद्ध्वस्त करीत चालली आहेत. त्यांना प्रतिरोध केला असता ते हल्ला करत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा समोर आल्याने शेतकरी भितीपोटी त्यांना प्रतिरोध करीत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत रानडुकरे धुमाकूळ घालून पिके उद्ध्वस्त करत चालले आहेत. रात्रीच्या किंवा सायंकाळच्यावेळी रानडुकरे कळपाने शेत परिसरात दाखल होतात. पायाने जमीन उकरून धुमाकूळ घालतात.
यामुळे पिके उन्मळून खाली पडत आहेत. एकामागून एक डुकरे पळत असल्यामुळे पिके त्यांच्या पायदळी तुडविली जातात. रानडुकरे हल्ला करत असल्याच्या कारणावरून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या शकली लढवित आहेत. काही ठिकाणी ताराचे कुंपण केले आहे तर काही ठिकाणी दोऱ्या बांधलेल्या आहेत. मात्र याच्या मधूनही डुक्कर शेत परिसरात प्रवेश करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या समस्येशी दोन हात कसे करावेत? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
पिके बहरात आली असताना त्याची नासधूस वन्य प्राण्यांमार्फत होत आहे. याची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांना विमाही मिळत नाही. याची दखल घेत शासनाने वन्य जीवांकडून पिकांची हानी झाली तर विमा द्यावा, अशी मागणी गोकुळ सानप यांनी पत्रकान्वये केली आहे.
शिरूर तालुक्यातील रायमोहा, आव्हळवाडी, हटकरवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी, येवलवाडी, वंजारवाडी, डिसलेवाडी, डोळेवाडी, दत्तनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात वन्य जीवांकडून नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा जिल्हा परिषदेने करावा व त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी गोकुळ सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे. तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा, त्याबाबत वन विभागाला सूचना द्यावेत, असेही सानप यांनी पत्रकात म्हटले आहे.(वार्ताहर)

Web Title: In the Shirur taluka, the randukar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.