वहीदकाकांच्या अंत्ययात्रेस जनसागर
By Admin | Updated: November 28, 2014 01:16 IST2014-11-28T00:58:33+5:302014-11-28T01:16:35+5:30
औरंगाबाद : ‘अमारत- ए- शरिया’चे मराठवाडाप्रमुख अब्दुल वहीद खान नक्षबंदी (काका) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वहीदकाकांच्या अंत्ययात्रेस जनसागर
औरंगाबाद : ‘अमारत- ए- शरिया’चे मराठवाडाप्रमुख अब्दुल वहीद खान नक्षबंदी (काका) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी जनसागर उसळला होता.
‘अमारत- ए- शरिया’, हिला कमिटीचे प्रमुख, काझी आदी विविध पदांवर मागील अनेक वर्षांपासून ते काम करीत होते. ८४ वर्षीय काका मागील काही दिवसांपासून आजारी होते. बुधवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. काल रात्रीपासूनच त्यांच्या रोहिला गल्ली येथील निवासस्थानी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.
सकाळी पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्यासह आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काका यांच्या मृतदेहास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास काकांचे पार्थिव किलेअर्कमार्गे जामा मशीद येथे आणण्यात आले. प्रत्येक नागरिकास त्यांना ‘खांदा’ देता यावा म्हणून त्यांच्या पार्थिव ठेवलेल्या पिंजऱ्याला मोठमोठे बांबू लावण्यात आले होते.
दुपारी जोहरच्या नमाजनंतर शहागंज मशीदचे पेशइमाम मौलाना मुजीब-उल्ला यांनी जनाजाची नमाज पढविली. यावेळी जामा मशीदमध्ये खूप गर्दी झाली होती. पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. जामा मशीदमध्ये परत एकदा शेवटचे दर्शन घेण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर पार्थिव किलेअर्क येथील पंचकुंआ कब्रस्तानात आणण्यात आले. या ठिकाणी दफनविधी करण्यात आला. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, माजी उपमहापौर मुजीब आलम खान, माजी मंत्री गंगाधर गाडे, बाबाजानी दुर्राणी, कदीर मौलाना, डॉ. गफ्फार कादरी, जावेद कुरैशी, शहनवाज खान, संजय जगताप, मुश्ताक अहेमद, एजाज जैदी, अताउल्ला खान, जुल्फेखार शेख, डॉ. मकदूम फारुकी, रशीदमामू, डॉ. जावेद मुकर्रम यांच्यासह डॉक्टर, वकील, राजकीय मंडळी, बोहरी समाजातील नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध मशिदींचे पेशइमाम, त्याचप्रमाणे सर्व मौलाना उपस्थित होते.