शिवारं फिरली, पण पोट रिकामेच!
By Admin | Updated: December 18, 2014 00:37 IST2014-12-18T00:30:44+5:302014-12-18T00:37:24+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात दाखल झालेले मेंढपाळांचे कळप शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत शेळ्या-मेंढ्यांना जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत

शिवारं फिरली, पण पोट रिकामेच!
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात दाखल झालेले मेंढपाळांचे कळप शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत शेळ्या-मेंढ्यांना जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी दिवस संपूर्ण शिवार फिरत असले तरी त्यांची पोटं रिकामीच राहत आहेत़ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा-पाण्यासाठी दिवस-रात्र भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
तालुक्यात साकोळ, घरणी, डोंगरगाव, पांढरवाडी आदी प्रकल्प असल्याने तसेच घरणी, मांजरा, लेंडी आदी मोठ्या नद्या असल्याने नदी किनारा आणि प्रकल्प परिसरात ग्रीनबेल्ट असतो़ त्यामुळे दर वर्षी सोलापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, अक्कलकोट आदी भागांतील मेंढपाळ मोठ्या संख्येने मार्च-एप्रिल महिन्यात येथे दाखल होत असतात.
परंतु, यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मेंढपाळांचे अनेक कळप येथे दाखल झाले आहेत. त्यांना घेऊन ते दिवसभर संपूर्ण शिवार पालथा घालीत आहेत. तरीही शेळ्या-मेंढ्यांची पोटं रिकामीच राहत असल्याने त्यांना जगवायचे तरी कसे? या समस्येने त्यांचे मोठे हाल होत आहेत. तालुक्यात यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाले असल्याने डिसेंबर महिन्यातच शिवारात उन्हाळा जाणवत असून, अनेक जलस्त्रोत कोरडीठाक पडले असल्याने शेतकरीच स्वत:चे पशुधन जगविण्यासाठी कसरत करीत असल्याने शेतात मेंढपाळ आलेले कोणीही खपवून घेत नाही. परिणामी, मेंढपाळांना डांबरी रस्त्याने झाडापाला शोधत फिरावे लागत आहे़ परंतु, पावसाअभावी झाडांवरही परिणाम झालेला दिसून येत आहे़ त्यामुळे दिवस-रात्र भटकंती करीत मेंढपाळ एका गावाहून दुसऱ्या गावात फिरत आहेत. (वार्ताहर)