महापौरपदी शेख बिनविरोध; उपमहापौर कांबळे ‘जिंकले’
By Admin | Updated: November 13, 2014 00:52 IST2014-11-13T00:48:29+5:302014-11-13T00:52:44+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली,

महापौरपदी शेख बिनविरोध; उपमहापौर कांबळे ‘जिंकले’
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी कैलास कांबळे हे ५० मते घेत ४२ मतांनी शिवसेनेच्या संभाजी बसपुरे यांचा पराभव करून निवडून आले. बसपुरे यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी महापौरपदी अख्तर शेख व उपमहापौरपदी कैलास कांबळे यांची निवड झाल्याचे घोषित केले.
लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरांची २० नोव्हेंबर रोजी मुदत संपणार असल्याने नव्या महापौरांची १२ नोव्हेंबर रोजी निवड करण्यात आली. महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेस विरुद्ध शिवसेना उमेदवार आमने-सामने होते. बुधवारी विशेष सभेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली इंद्राळे यांनी अर्ज माघार घेतला. उपमहापौरपदासाठीही दोन अर्ज वैध ठरले. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक झाली. यात काँग्रेसचे कैलास कांबळे यांना ५० तर शिवसेनेचे बसपुरे यांना ८ मते मिळाली. निवडीनंतर महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे यांचा मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल, राकाँचे गटनेते मकरंद सावे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेनेच्या गटनेत्या सुनीता चाळक यांनी सत्कार केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदेकर, उप जिल्हाधिकारी विकास खपले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. (प्रतिनिधी)
सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. महापौरपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली इंद्राळे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. माघार घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली होती. मात्र मुदतीत अर्ज माघार घेण्यात आला नसल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात कैलास कांबळे यांना काँग्रेसचे ४८, रिपाइंचे २ अशी ५० मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार संभाजी बसपुरे यांना शिवसेनेचे ६ व राष्ट्रवादी काँग्रेसची २ अशी ८ मते मिळाली. खा. रामदास आठवलेंची रिपाइं लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत यापूर्वी ‘शिवशक्ती’सोबत राहिली आहे. परंतु, आता महायुती तोडून ती काँग्रेससोबत जोडली गेली.