अवकाळी पाठ सोडेना

By Admin | Updated: April 14, 2015 00:39 IST2015-04-14T00:39:33+5:302015-04-14T00:39:33+5:30

जालना : जिल्ह्यात अवकाळी पाऊस अद्यापही पाठ सोडेनासा झाला आहे. सलग चौथ्या दिवशी जालना, परतूर, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

Shedding time | अवकाळी पाठ सोडेना

अवकाळी पाठ सोडेना


जालना : जिल्ह्यात अवकाळी पाऊस अद्यापही पाठ सोडेनासा झाला आहे. सलग चौथ्या दिवशी जालना, परतूर, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.
जालना तालुक्यातील सेवली, नेर, रामनगर, हडप, सावरगाव, दरेगाव, राममूर्ती, इंदेवाडी, जामवाडी या भागात दुपारी ४ वाजेनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परतूर तालुक्यातील वाटूर, आंबा, आष्टी, केंधळी, श्रीष्टी, हातडी इत्यादी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव परिसरातही गारपिट झाली. गारांचा आकार हरभऱ्याएवढा होता. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
सेवली, सावरगाव भागडे, पाष्टा, सोनदेव, एरंडवडगाव, वरखेड यासह अनेक गावांमध्ये गारांचा पाऊस झाला. गारपिटीमुळे कांदा, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जनावरांना लागणाऱ्या शाळू ज्वारीचा कडबा पूर्णपणे काळा झाला आहे. सेवली परिसरात हळदीच्या पिकाचेही पावसाने नुकसान झाले आहे.
भोकरदन शहरासह तालुक्यात सायंकाळी ५ नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राजूर, हसनाबाद, केदारखेडा, दानापूर, आन्वा, इब्राहिमपूर, लिंगेवाडी इत्यादी भागात जोरदार पाऊस झाला.
चार दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या वादळासह गारपिट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, शाळू (ज्वारी), मका, कांदा, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shedding time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.