शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:38 IST2017-11-12T00:38:21+5:302017-11-12T00:38:36+5:30
सध्या शिवसेना गटबाजीने पोखरली असून, त्याचा प्रत्यय सतत येत आहे.

शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सध्या शिवसेना गटबाजीने पोखरली असून, त्याचा प्रत्यय सतत येत आहे. नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नड येथे होणाºया कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत त्या भागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांना स्थान देण्यात आले नाही. मात्र इतर भागाचे जिल्हाप्रमुख असलेले अंबादास दानवे यांच्या नावाला अग्रक्रम देण्यात आला आहे.
शिवसेनेतील गटबाजीचा वारंवार प्रत्यय येत आहे. चार दिवसांपूर्वीच खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात संस्थान गणपती येथे रस्त्यावरच जोरदार खडाजंगी झाली होती. प्रकरण हातघाईवर जाणार असतानाच उपस्थितांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा ठेवला आहे. या सोहळ्यानिमित्त निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या निमंत्रण पत्रिकेतसुद्धा राजकारण केल्याचे एका गटाचे म्हणणे आहे. शिवसेनेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन जिल्हाप्रमुख नेमले जातात.
या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या अधिकार क्षेत्राचे वाटप झालेले असते. या अधिकारानुसार कन्नडचे जिल्हाप्रमुख म्हणून नरेंद्र त्रिवेदी यांच्याकडे पदभार आहे; मात्र आ.जाधव यांनी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांनाच स्थान देण्यात आलेले नाही.
याचवेळी इतर भागाचा पदभार असलेले दुसरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव अग्रक्रमाने छापण्यात आले आहे. यावरून सध्या शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. या निमंत्रण पत्रिकेवर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आ. संजय शिरसाठ, नंदकुमार घोडेले आणि अंबादास दानवे यांना स्थान देण्यात आले आहे; मात्र नरेंद्र त्रिवेदींना डावलण्यात आल्याचे दिसून येते.