श्रावण आला अन् सण झाले गोळा

By Admin | Updated: July 27, 2014 01:16 IST2014-07-27T00:44:10+5:302014-07-27T01:16:39+5:30

यशवंत परांडकर, नांदेड श्रावण महिन्यास प्रारंभ झाला की, अनेक सण गोळा होतात.

Shawran came and the festival was collected | श्रावण आला अन् सण झाले गोळा

श्रावण आला अन् सण झाले गोळा

यशवंत परांडकर, नांदेड
श्रावण महिन्यास प्रारंभ झाला की, अनेक सण गोळा होतात. विशेष करुन महादेवाची आराधना या महिन्यात केली जाते. निमित्ताने श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध बाजारपेठेत विक्रेत्यांनी बेल व विविध फुलांची दुकाने थाटलेली दिसून आली.
श्रावण हा पाचवा आणि पाचूसारखा हिरवागार महिना. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असते म्हणून श्रावण हे नाव. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. क्षणात सूर्यकिरणे धरणीवर अवतरतात, तर दुसऱ्याच क्षणी घननिळा बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात.
ऊन-पावसाचा विलोभनीय लपंडाव या दिवसांत अनुभवायला मिळतो. श्रावण जलबिंदूच्या माध्यमातून सूर्याच्या सप्तरंगांचे मनोहारी दर्शन घडवितो. या महिन्यातील सोमवारी एक वेळ जेऊन शिवव्रत करतात. मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात, तर भाविक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतात, हळदी-कुंकू देतात. रविवारी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करतात. श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. नागपंचमी साजरी होते, नारळी पौर्णिमेला कोळी बांधव नदी वा समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. याच दिवशी बहीण भावाला राखी बांधून हे पवित्र नाते अधिक घट्ट करते.
श्रीकृष्णाचा जन्मदिवस कृष्णाष्टमीला आणि नवमीला गोपाळकाला हा दहीहंडी उत्सव साजरा होतो. श्रावणी आमावास्येला बैलपोळ्याचा सण (पिठोरी) साजरा होतो. चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ मास म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात.
शहरातील वजिराबाद, कलामंदिर, भाग्यनगर, आनंदनगर, वर्कशॉप, तरोडा खुर्द-बुद्रुक, श्रीनगर, शिवाजीनगर आदी ठिकाणी बेल, फुले घेताना भाविकांची वर्दळ दिसून आली.
दरम्यान, श्रीनगर भागातील केळी विक्रेते संग्राम कांबळे यांनी सांगितले की, आजपासून श्रावण महिना सुरु झाला असून अनेक भाविक उपवासासाठी केळीची मागणी करतात. सध्या ३० ते ४० रुपये प्रति डझनप्रमाणे केळी विकली जात आहे.

Web Title: Shawran came and the festival was collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.