परंड्यात सभापतीपदासाठी तगडी ‘फिल्डींग’
By Admin | Updated: March 4, 2017 00:31 IST2017-03-04T00:30:26+5:302017-03-04T00:31:07+5:30
परंडा : पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवून राष्ट्रवादीने १० पैकी सात जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित बहुमत राखले आहे़

परंड्यात सभापतीपदासाठी तगडी ‘फिल्डींग’
परंडा : पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवून राष्ट्रवादीने १० पैकी सात जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित बहुमत राखले आहे़ आता सभापती, उपसभापती निवडीच्या हलचालींना वेग आला असून, प्रणिता मोरे व अनुजा दैन ही नावे सध्या आघाडीवर आहेत़ सभापतीपदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी या दोन्ही उमेदवारांच्याकडून मोठी फिल्डींग लावण्यात येत आहे़
परंडा पंचायत समिती निवडणुकीत १० पैकी सात जागा राष्ट्रवादीला, दोन शिवसेनेला तर एक जागा भाजपाला मिळाली आहे़ यापूर्वी पंचायत समितीवर शिवसेना-रिपाइं यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. शिवसेनेने बहुमताच्या जोरावर सभापतीपद काशीबाई इतापे यांना तर उपसभापतीपद मेघराज पाटील यांना दिले होते. अडीच वर्षानंतरही इतापे यांच्यासह मेघराज पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली होती़ सलग पाच वर्ष या दोघांनी ही पदे संभाळली़ मात्र, या निवडणुकीत सभापती काशीबाई इतापे पराभूत झाल्या़ तर शिवसेनेने मेघराज पाटील यांना या निवडणुकीत डावलले होते.
सत्ताधारी शिवसेनेसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये चौरंगी लढत झाली़ आमदार राहुल मोटे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार प्रा़ तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ मात्र, या निवडणुकीत आमदार राहुल मोटे यांनी बाजी मारत पंचायत समितीच्या दहा पैकी सात जागा जिंकून पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त केले. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे. सद्यस्थितीत आनाळा गणाच्या नवनिर्वाचित सदस्या प्रणिता मोरे यांचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर आहे़ मात्र, शेळगाव सर्कलचे अॅड़ सुभाष मोरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शेळगाव गणातून अनुजा दैन यांनी मोठया फरकाने विजयश्री प्राप्त केली आहे़ त्यामुळे त्यांच्या नावालाही राष्ट्रवादी काँग्रेसमधून पसंती दिली जात आहे. सभापती पदासाठी दैन व मोरे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच सुरु असून, दोन्ही बाजूंनी जोरदार फिल्डींग लावली जात आहे़ त्यामुळे सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.