शहरात ‘झोपु’ योजना
By Admin | Updated: February 14, 2015 00:12 IST2015-02-14T00:03:13+5:302015-02-14T00:12:51+5:30
औरंगाबाद : मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाणार असून, या अंतर्गत शहरातील ५२ झोपडपट्ट्यांमधील गरिबांना मोफत घरे दिली जातील,

शहरात ‘झोपु’ योजना
औरंगाबाद : मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाणार असून, या अंतर्गत शहरातील ५२ झोपडपट्ट्यांमधील गरिबांना मोफत घरे दिली जातील, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी आज औरंगाबादेत केली.
सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कदम यांनी वरील घोषणा केली. यावेळी महापौर कला ओझा, आ. संजय शिरसाट, आ. अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक विकास जैन आदींची उपस्थिती होती.
कदम म्हणाले, औरंगाबाद शहरात ५२ झोपडपट्ट्या आहेत. या सर्वांना मोफत चांगली घरे दिल्यास त्यांचे जीवनमान सुधारूशकेल. याचा विचार करून आम्ही औरंगाबादेत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे ठरविले आहे. याबाबत मनपाच्या येत्या २० फेबु्रवारीच्या सर्वसाधारण सभेत तसा ठरावही मंजूर करून घेण्यात येणार आहे.
यामध्ये खाजगी विकसकाकडून झोपडपट्टीच्या जागेवर गरिबांसाठी मोफत घरे बांधून घेतली जातील. त्या बदल्यात संबंधित विकसकाला काही मोकळी जागा मिळेल.
या योजनेमुळे त्या- त्या भागात रस्ते, मैदाने या सुविधा उपलब्ध होऊन शहराच्या सौंदर्यातही भर पडेल. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, लवकरच ही योजना येथे लागू होईल, असेही कदम यांनी जाहीर केले.
पुनरुज्जीवन करणार
महात्मा फुले महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या या महामंडळामार्फत गरजूंना कर्ज मिळणे बंद झाले आहे. मात्र ही गत मागच्या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या कामाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर या महामंडळाचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.