टोकणीचा शंभू-महादेव मंदिर परिसर बहरतोय..
By Admin | Updated: August 6, 2014 02:27 IST2014-08-06T01:07:38+5:302014-08-06T02:27:18+5:30
कळंब : कोठाळवाडी येथील टोकणी वरील शंभू-महादेवाचे हे देवस्थान प्रमुख तीर्थस्थळ

टोकणीचा शंभू-महादेव मंदिर परिसर बहरतोय..
कळंब : निसर्गाच्या कुशीत कळंब रस्त्यावर असलेल्या कोठाळवाडी येथील टोकणी वरील शंभू-महादेवाचे हे देवस्थान तालुक्यातील एक प्रमुख तीर्थस्थळ असून याठिकाणी श्रावणमासात भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नातून याठिकाणी विविध कामे राबविण्यात येत आहेत.
कळंब- ईटकूर,-पारा या प्रमुख जिल्हा मार्गावर कोठाळवाडी हद्दीत एक डोंगराची टेकडी आहे. जवळपास ७० हेक्टर क्षेत्र असलेल्या या टेकडीस तालुक्यात टोकणी असे संबोधले जाते. या टोकणीवर पुरातन शंभू महादेवाचे जागृत देवस्थान आहे. लगतच्या क्षेत्रावर सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षलागवड केली आहे. मधोमध जाणारा जिल्हा मार्ग आणि आसपास बहरलेली गर्द झाडी भावी भक्तांसह निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
याठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. तसेच श्रावण मासामध्ये व श्रावणी सोमवारला भाविक दर्शनासाठी मोठी करीत आहेत. याठिकाणी कल्पनाताई नरहिरे, राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून भाविकांच्या सोयीसाठी सभागृहे बांधण्यात आली आहेत. महाशिवरात्रीनिमित्ताने नवससायास फेडण्यासाठीही भाविक येथे येतात. आजही शिखरावरून बाळाला फेकण्याचा नवस येथे फेडला जात आहे.
याठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बारमाही पाण्याची सोय करण्यात येत आहे. सरपंच अनंत लंगडे यांनी या तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. तिर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात आला असून रात्रीच्या प्रकाश व्यवस्ेसाठी सौर दिवे बसविण्यात आले आहेत. शिवाय परिसरातील रस्ते काँक्रीटमय करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. परिसरातील सिमेंट रस्ते व नाल्या बांधून मधोमध वृक्षवल्ली लावण्यात येणार असल्याचे अनंत लंगडे यांनी सांगितले. (वार्ताहर)