सणांच्या तोंडावर शिमगा़़़

By Admin | Updated: September 24, 2014 00:45 IST2014-09-24T00:40:18+5:302014-09-24T00:45:58+5:30

उदगीर : सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाश्यांची सोय व्हावी, यासाठी रेल्वे बोर्डाकडून देशभरात २०० विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत़

Shamgaon in the festivals | सणांच्या तोंडावर शिमगा़़़

सणांच्या तोंडावर शिमगा़़़


उदगीर : सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाश्यांची सोय व्हावी, यासाठी रेल्वे बोर्डाकडून देशभरात २०० विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत़ त्यापैकी काही महाराष्ट्राच्या वाट्यालाही आल्या़ परंतु, नेहमीप्रमाणे याहीवेळी रेल्वेकडून मराठवाड्याच्या पदरी मात्र पुन्हा उपेक्षा पडली़ आजघडीला एकही विशेष गाडी मराठवाड्यात न सोडता रेल्वे बोर्डाने प्रांतद्वेषाची भावना निर्माण केल्याचा आरोप उदगीर रेल्वे संघर्ष समितीने केला आहे़
दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गरज लक्षात घेवून दरवर्षीच शेकडो विशेष गाडया रेल्वे बोर्डाकडून सोडण्यात येतात़ यंदाही तब्बल २०० विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा बोर्डाने जाहीर केली आहे़ परंतु, यापैकी एकही गाडी मराठवाड्यात सोडली नाही़
मराठवाड्यातील रेल्वेचा भाग दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वेशी जोडला गेला आहे़ नांदेड विभाग व सिकंदराबाद विभागातील विकाराबाद-परळी मार्गावर एकही विशेष गाडी घोषित झाली नाही़
विशेषत: सीमावर्ती भागातील हजारो नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने पुण्या-मुंबईत स्थायिक आहेत़ प्रतिवर्षीच या सणात ते गावाकडे परतत असतात़ दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता नियमित रेल्वेगाड्यांमध्ये अगदी पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसते़ बऱ्याचदा जागेवरुन प्रवाशांत हाणामारीच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत़ लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांसोबतच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बीदर जिल्ह्यातील नागरिकांची रेल्वेला या काळात मोठी गर्दी असते़ तरीही रेल्वे बोर्डाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोपही रेल्वे संघर्ष समितीने केला आहे़
उदगीर रेल्चे संघर्ष समितीने विशेष गाडी न मिळाल्याच्या विरोधात बोर्डाकडे तक्रार केली आहे़ जाणीवपूर्वक होणाऱ्या या अन्यायामुळे क्षमता व पात्रता असणाऱ्या मराठवाडयातील रेल्वे रुळावर बोर्डाची सुविधेची गाडी धावत नाही, ही खंत अद्याप कायम आहे़
निवडणुकांच्या हंगामात लोकप्रतिनिधी व्यस्त आहेत़ या व्यस्ततेतून या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधी वेळ देत नसल्याचा आरोपही रेल्वे संघर्ष समितीने केला आहे़ या अन्यायाविरुद्ध लढा देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली़
सध्या उदगीर शहरातून दररोज पुण्या-मुंबईला जवळपास ३० वाहने धावतात़ त्यात एसटीची ६ तर खाजगी २४ वाहने आहेत़ मुंबईसाठी उदगीरमधून एकमेव देगलूर-मुंबई एसटी सुरु आहे़ पुण्यासाठी ५ एसटी धावतात़ याशिवाय, पुण्याकडे धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची संख्या १६ तर मुंबईला ८ खाजगी ट्रॅव्हल्स धावतात़ या वाहनांच्या माध्यमातून दररोज दीड हजारांवर प्रवासी ये-जा करीत आहेत़ तरीही ही वाहने प्रवाश्यांसाठी तुटपुंजी ठरत आहेत़
४ऐन मोसमात खाजगी वाहनांकडून अगदी ८०० ते १ हजार रुपयांपर्यंत तिकिट आकारले जाते़ त्यामुळे सध्या ट्रॅव्हल्स चालकांकडून अ‍ॅडव्हान्स बुकिंग नाकारले जात आहे़ प्रवाशांचा इतका ओघ या भागात असतानाही रेल्वे बोर्डाने एकही विशेष गाडी न सोडून अन्याय केल्याची भावना आहे़

Web Title: Shamgaon in the festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.