शैलेश स्वामी, स्नेहलता अग्रवाल यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By Admin | Updated: March 20, 2017 23:42 IST2017-03-20T23:39:38+5:302017-03-20T23:42:11+5:30
लातूर : भारतीय जनता पार्टीत इनकमिंग जोरात सुरू आहे. दररोज कोणाचा ना कोणाचा प्रवेश या पक्षात होत आहे.

शैलेश स्वामी, स्नेहलता अग्रवाल यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
लातूर : भारतीय जनता पार्टीत इनकमिंग जोरात सुरू आहे. दररोज कोणाचा ना कोणाचा प्रवेश या पक्षात होत आहे. पालकमंत्री लातुरात आले की, पक्षप्रवेश सोहळा सुरू झालाच असे चित्र सध्या आहे. सोमवारी नगरसेवक शैलेश स्वामी आणि स्नेहलता अग्रवाल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. तर काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वनिता काळे याही भाजपात डेरेदाखल झाल्या आहेत.
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांना भाजपात खेचण्याचा सपाटाच सुरू ठेवला आहे. एक महिन्यापूर्वी काँग्रेसचे माजी महापौर अख्तर शेख यांना पक्षात घेतले. ही चर्चा थांबत नाही, तोवर काँग्रेसचे माजी उपमहापौर सुरेश पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत पक्षप्रवेश घडवून आणला. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांतील कार्यकर्ते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शैलेश स्वामी हेही भाजपात सोमवारी डेरेदाखल झाले आहेत. तर त्यांच्या समवेत गेली दोन टर्म नगरसेविका म्हणून राहिलेल्या स्नेहलता अग्रवाल याही भाजपात विराजमान झाल्या आहेत. लातूर मनपात शैलेश स्वामी अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. शेवटी सोमवारी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुधीर धुत्तेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी लातूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यातही जि.प. निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्या अनिता परगे यांना भाजपात प्रवेश दिला.