शाहिद खानने मित्राकडे ठेवलेली दुचाकी जप्त
By Admin | Updated: August 2, 2016 00:27 IST2016-08-02T00:25:14+5:302016-08-02T00:27:34+5:30
औरंगाबाद : परभणी येथून स्फोटकाच्या साठ्यासह दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या शाहिद खान याचे औरंगाबादशी जवळचे नाते आहे.

शाहिद खानने मित्राकडे ठेवलेली दुचाकी जप्त
औरंगाबाद : परभणी येथून स्फोटकाच्या साठ्यासह दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या शाहिद खान याचे औरंगाबादशी जवळचे नाते आहे. तो एका मोबाईल कंपनीत तीन ते चार वर्षे कार्यरत होता. त्यावेळी त्याचे येथील एका जणासोबत चांगलीच मैैत्री झालेली आहे. या मित्राकडे त्याने चुकीचा क्रमांक असलेली दुचाकी आणून ठेवल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शाहिदला अटक झाल्याचे समजताच त्याच्या या मित्राने तात्काळ पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या दुचाकीची माहिती त्यांना दिली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या परभणी येथील अन्सारबीन चाऊस यास १४ जुलैै रोजी एटीएसने परभणी येथून उचलले. त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार शाहिद खान यासही एटीएसने परभणी येथेच पकडले. त्यावेळी त्याच्याकडून आयईडी या स्फोटकाचा मोठा साठा हस्तगत केला. शिवाय दोन जिवंत बॉम्बही त्याच्याकडे मिळाल्याची माहिती सूत्राने दिली. शाहिद खान याने दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादेतील मित्राकडे एक दुचाकी आणून ठेवली होती. या गाडीबाबत संशय येऊ नये, म्हणून शाहिदने त्यावर क्रमांक बदलला होता.
दरम्यान शाहिदला एटीएसने अटक केल्याचे वृत्त झळकताच त्याच्या मित्राला या दुचाकीबद्दल संशय आला. त्याने चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन या दुचाकीची माहिती त्यांना दिली. त्यानंतर आयुक्तांनी तात्काळ गुन्हे शाखेला ही दुचाकी ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच एटीएसच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्याच्या या मित्राबाबत कळवले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या या मित्राची सखोल चौकशी केली. त्याचा जबाव नोंदवून घेतला.