उपवासाच्या वस्तंूवर दुष्काळाची छाया
By Admin | Updated: July 7, 2014 00:43 IST2014-07-07T00:30:46+5:302014-07-07T00:43:05+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद एरव्ही साप्ताहिक उपवास करणाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरीही वर्षातून दोनदा अर्थात आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते.

उपवासाच्या वस्तंूवर दुष्काळाची छाया
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
एरव्ही साप्ताहिक उपवास करणाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरीही वर्षातून दोनदा अर्थात आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. प्रत्येक परिवारातील बहुतांश सदस्य उपवास करतातच. यासाठी मागील आठवडाभरात बाजारपेठेत शेंगदाणा, साबुदाणा व भगर मिळून १७० टन आवक झाली आहे. हा माल सुमारे ११० कोटींचा आहे. मात्र, आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन अजूनही निम्मा माल शिल्लकच राहिला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. उपवासाच्या वस्तंूवर दुष्काळाचा असाही परिणाम दिसून येत आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या ७ ते ८ दिवस अगोदरच मोंढ्यात उपवासाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी किराणा दुकानदार गर्दी करीत असतात. आषाढीचा उपवासाच्या माल संपतो व चातुर्मासातील उपवासासाठी नवीन आॅर्डर होलसेल व्यापारी देत असतात. मात्र, यंदा आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली तरी अजूनसुद्धा निम्माही माल संपला नाही. दुष्काळामुळे बदललेली मानसिकता यावरून लक्षात येते. औरंगाबादेतून जिल्ह्यात उपवासाच्या वस्तू विक्रीसाठी पाठविल्या जात असतात. यंदा दुष्काळामुळे उपवासाचा माल कमी विक्री होईल. या व्यापारी अंदाजामुळे होलसेलरने थोडा उशिराच माल मागविला. मागील आठवड्यात मोंढ्यात कर्नाटक, आंध्र प्रदेशातून १०० टन शेंगदाणे, तामिळनाडूतील सेलम येथून ५० टन साबुदाणा व नाशिक जिल्ह्यातून २० टन भगरीची आवक झाली. आवक उशिरा झाल्याने किलोमागे ४ ते ५ रुपयांनी भाव वाढले. साबुदाणा ६८ ते ७० रुपये, भगर ६५ ते ७० रुपये, तर शेंगदाणा ५४ ते ६२ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.
आषाढी एकादशीच्या आदल्या आठवड्यात या उपवासाच्या वस्तूंना एवढी मागणी असते की, होलसेल विक्रेत्यांना चहा पिण्यासही फुरसत नसते. मात्र, मागील आठवड्यात होलसेल व्यापारी किराणा दुकानदारांची प्रतीक्षा करीत होते.
होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, ११० कोटींपैकी फक्त ६० ते ६५ कोटींचाच शेंगदाणा, साबुदाणा, भगर विकली गेली. शहरातून मागणी कमी होतीच. शिवाय ग्रामीण भागातील उठाव निम्म्याने घटला याचा परिणाम झाला आहे. एरव्ही महागाई वाढली तरीही ग्राहक उपवासाच्या वस्तू खरेदी करतातच; पण पहिल्यांदा मागणी घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.