रक्षा बंधनावर दुष्काळाची छाया
By Admin | Updated: August 7, 2014 00:16 IST2014-08-07T00:12:12+5:302014-08-07T00:16:38+5:30
हिंगोली : बहीण-भावाच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधनाचा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु यंदा दुष्काळाची छाया जिल्ह्यावर असल्याने बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली.

रक्षा बंधनावर दुष्काळाची छाया
हिंगोली : बहीण-भावाच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधनाचा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु यंदा दुष्काळाची छाया जिल्ह्यावर असल्याने बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. परिणामी दरवर्षी नागपंचमीपासून बाजारात दिसणारी गर्दी आणि लखलखाट पहावयास मिळत नाही.
१० आॅगस्ट रोजी देशभर हा सण साजरा होईल. मराठवाड्यात लोक या सणापासून थोडे लांबच असल्याने हिंगोलीचे चित्र वेगळे नाही. जिल्ह्याची इकॉनामी शेतीवर अवलंबून असल्याने यंदा पिकांची अवस्था बिकट आहे. उशिरा पेरणी झाल्यामुळे उत्पादनात घट होईल. दरम्यान पावसातही अनियमितता व अनिश्चिता असल्याने अधिक खर्च करण्यासाठी शेतकरी हात आखडता घेत आहेत. परिणामी बाजाराच्या उलाढालीवर फटका बसल्याने व्यापाऱ्यांना हातावर हातावर हात धरून बसावे लागत आहे. प्रतिवर्षी नागपंचमीपासून राख्यांचे विविध ठिकाणी दुकाने लागलेले दिसतात. रस्त्यांवरील गाड्यांवरही राख्या विकणाऱ्यांची संख्या लक्षणिय असते.
चार दिवसांवर सण आला असताना गतवर्षीचे चित्र दिसत नाही. राख्यांसाठी महिलांना दुकाने शोधावे लागतात. पीकपरिस्थिती पाहता व्यापाऱ्यांनी देखील राख्या विक्रीसाठी आणल्या नाहीत. अगदी मोजके दुकाने हिंगोलीत आढळतात. त्यावर व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसतात. दिवसभरात मोजता येतील एवढेच ग्राहक खरेदीसाठी येतात. काही व्यापाऱ्यांनी गुंतविलेले पैसे यंदा निघण्याची शक्यता कमी आहे. मागील ३१ वर्षांपासून पहिल्यांदा विपरित चित्र असल्याचे विक्रेता तरूण जयस्वाल यांनी सांगितले.
आकर्षक राख्या बाजारात
बाजार थंड असला तरी हिंगोलीत विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात राख्या विक्रीसाठी आणल्या आहेत. फॅन्सी, दोरी, जरी, रेशम प्रकारातील राख्यांची सध्या चलती आहे. किमान १ रूपयांपासून ४० रूपयांपर्यंत या राखीची किंमत आहेत. दुसरीकडे स्टोन राख्यांची किंमत अधिक असल्याने ५० ते १०० रूपयांपर्यंत ग्राहकांना पैसे मोजावे लागतात. चमकदार स्टोनमुळे या राख्यांची किमती वाढल्या आहेत. पूर्वी स्पंजच्या राख्यांनी हात भरून दिसत होता. दूरवरून या राख्या दृष्टीस पडत होत्या. पण या राख्या इहितास जमा होण्याचा मार्गावर आहेत. उलट जितक्या लहान असेल तितकी अधिक पसंती ग्राहकांची लाभते. विक्रेत्यांनी त्याचा विचार करून नाजूक, लहान आकाराच्या राख्या मागविल्या असल्याचे शेख जमीर यांनी सांगितले. प्रथमच गणपती, स्वास्तीक, ओम चिन्हाच्या राख्या बाजारात आल्या आहेत.