‘शाडू’चे बाप्पा मुलांना भावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 00:27 IST2016-09-03T00:16:41+5:302016-09-03T00:27:14+5:30
जालना : इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याच्या सोमवारपासून सुरू झालेल्या उपक्रमास शुक्रवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात दोन शाळा

‘शाडू’चे बाप्पा मुलांना भावले
जालना : इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याच्या सोमवारपासून सुरू झालेल्या उपक्रमास शुक्रवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात दोन शाळा आणि एका कोचिंग क्लासेसमध्ये तब्बल ५१० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पर्यावरण बचावच्या दिशेने टाकण्यात आलेल्या पावलास विद्यार्थ्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आगामी काळात ही लोकचळवळ होण्याचे संकेत आहेत.
लोकमत वृत्तपत्र समूह आणि मैत्र मांदियाळी प्रतिष्ठाणच्या वतीने पाच दिवसांपासून जालना शहरातील विविध शाळांमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण मोरया फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून दिले गेले. शुक्रवारी रामचंद्र किनगावकर विद्यालय, पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि अभिजात कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या काही वर्षांत विविध प्रकारच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. परिणामी ग्लोबल वार्मिंगसारखे जागतिक प्रश्न निर्माण होऊन ऋतुचक्र बिघडले आहे. गेल्या काही वर्षात पर्जन्यमानही कमी झाले आहे. याचा थेट परिणाम मानवी जीवनावर झाला असून, मराठवाड्यात तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच ऋतुचक्र बदलामुळे अडचणीत आली
आहे.
याचे परिणाम मानवी आरोग्यावरही होत असून, वेळीच यावर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती अनेक अभ्यासातून दिसून आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भावी पिढीत याबाबतची जनजागृती व्हावी, जेणेकरून प्रदुषण कमी होऊन निसर्गाचा समतोल साधला जाऊ शकेल. लोकमत वृत्तपत्र समुहाने या दिशेने पाऊल टाकत मैत्र मांदियाळी प्रतिष्ठाणच्या मदतीने जालना शहरातील दहा शाळांमध्ये शाडू माती गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. या छोट्याशा उपक्रमाचे आगामी काळात लोकचळवळीत रूपांतर होण्यास मदतच होईल, असेच चित्र गेल्या पाच दिवसांत विविध शाळांत दिसून आले. गेल्या पाच दिवसांत एक हजार पन्नास विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. यामध्ये विविध धर्मांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, हे विशेष!
उप्रकमास मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे, एस. एम. फुके, बारवकर, कैलास शिंदे, अमोल घुगे, निवृत्ती रुद्राक्ष, ज्ञानेश्वर सातपुते, अरुण वादरळ, धम्मरत्न कुटे, प्रदीप इंगोले, शिवम कांबळे, अमोल व्यवहारे, सिद्धार्थ जाधव, फिलीप कसबे, किशोर ढिल्पे, किनगावकर शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा देव, पोदार शाळेचे मुख्याध्यापक रावत, चकोर, आहेर यांच्यासह शिक्षकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)