विद्यार्थिनीची छेडछाड; तिघांना सक्तमजुरी
By Admin | Updated: July 31, 2016 01:12 IST2016-07-31T01:06:03+5:302016-07-31T01:12:18+5:30
उमरगा : शाळकरी मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकरणी उमरगा न्यायालयाने तिघांना तीन वर्ष सक्त मजुरी व एकूण ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला

विद्यार्थिनीची छेडछाड; तिघांना सक्तमजुरी
उमरगा : शाळकरी मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकरणी उमरगा न्यायालयाने तिघांना तीन वर्ष सक्त मजुरी व एकूण ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही घटना २० मार्च २०१५ रोजी घडली होती.
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी दिलेल्या ामाहितीनुसार २० मार्च २०१५ रोजी त्रिकोळी येथील काही विद्यार्थी मुळज जिल्हा परिषद शाळेत दहावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी आले होते. दुपारी परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थिनी गावाकडे परत जाण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर वाहनाची वाट पहात थांबल्या होत्या. यावेळी मुळज येथील प्रकाश रमेश वडदरे (वय २३), सचिन गोविंद जमादार (वय २२), विष्णू शेषेराव भोसले (वय १९) व अन्य तीन अल्पवयीन आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून या मुलींची छेड काढली. यावेळी शाळेतील त्यांच्या वर्गातील ओंकार वाडीकर आणि विकास दुधभाते हे त्या मुलींना विचारपूस करीत असताना या आरोपितांनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी काही पीडित मुलींनी वर्गशिक्षक विश्वजीत दुबे यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी येवून हे भांडण सोडविले व पीडित मुलीसह दोन्ही विद्यार्थ्यांना टमटममध्ये बसवून त्रिकोळी गावाकडे पाठविले.
यानंतर सदर आरोपीत हे सायकलवरून टमटमच्या पाठीमागे गेल्यामुळे वर्गशिक्षक दुबे व शिक्षक धनराज सूर्यवंशी हेही दुचाकीवरून त्यांच्या मागे गेले. यावेळी मूळज-त्रिकोळी रोडवर या आरोपींनी टमटम अडवून टमटममधील मुली व मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच मुलींना मारहाण करून त्यांच्या कपड्याला ओढाओढी करून त्यांचा विनयभंग केला. यावेळी आजुबाजुचे लोक जमा झाल्याने आरोपी पळून गेले. याप्रकरणी विश्वजीत दुबे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर या आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तिघा अल्पवयीन आरोपींना उस्मानाबाद येथील बाल न्यायालयात नेण्यात आले तर उर्वरित आरोपींविरुद्ध तपासाअंती विशेष न्यायाधीश उमरगा यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
यावेळी न्यायालयासमोर आलेल्या साक्षी, पुरावे व तत्कालीन अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व्ही. एस. आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने प्रकाश वडदरे, सचिन जमादार व विष्णू भोसले यांना कलम १४३, १४७, ३५४, ३५४-ब, सह १४९ भादंवि तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायदा २०१२ कलम ८ प्रमाणे दोषी ठरवून कलम १४३ अन्वये दोन महिने सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास एक महिना सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली. याशिवाय कलम १४३ अन्वये एक वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक महिना सक्त मजुरी, कलम ३२३ अन्वये सहा महिने सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक महिना साधी कैद, कलम ३५४ अन्वये दोन वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास दोन महिने सक्त मजुरी, तसेच कलम ३५४-ब अन्वये तीन वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिने सक्त मजुरी व कलम ५०४ अन्वये सहा महिने सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. वरील सर्व शिक्षा आरोपींनी एकत्रित भोगावयाच्या आहेत. शिक्षेच्या मुद्यावर अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी युक्तीवाद केला. (वार्ताहर)