मराठवाड्यातील रस्त्यांची झाली चाळणी
By Admin | Updated: December 17, 2015 00:14 IST2015-12-17T00:01:45+5:302015-12-17T00:14:13+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील १५ हजार ५०० कि़मी. रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे.

मराठवाड्यातील रस्त्यांची झाली चाळणी
औरंगाबाद : मराठवाड्यातील १५ हजार ५०० कि़मी. रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. विभागातील सुमारे २२ हजार कि़मी. रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. त्यातील ७० टक्के रस्ते खड्ड्यांमुळे खराब झाल्याचा प्राथमिक अहवाल बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी विभागाने केली असून, अधिवेशनात त्या मागणीला मंजुरी मिळावी, यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विभागातील खड्डे बुजविण्यासाठी २ हजार कोटी रुपये लागतील, असा आराखडा मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी ५ डिसेंबर रोजी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला. विभागात केंद्र, राज्य शासनाचे मिळून ६५ हजार ४९७ किलोमीटर रस्ते आहेत. १२ हजार २५२ जिल्हा रस्ते आणि ३१ हजार ३६८ किलोमीटर ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे आहेत. २१ हजार किलोमीटर रस्त्यांची बांधकाम विभाग, तर ८१६ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची देखभाल केंद्र शासन करते.
विभागातील रस्त्यांचा २० टक्के घसारा गृहीत धरला, तर सुमारे ४ हजार किलोमीटर रस्त्यांवर खड्डे पडल्याचा अंदाज बांधकाम विभागाने काढला होता. पॅचवर्कसाठी सुमारे १०० ते १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता; परंतु पाहणीनंतर ७० टक्के घसारा झाल्याचे समोर आल्यामुळे पॅचवर्कचा खर्च २ हजार कोटींच्या घरात गेला.
विभागातील जुन्या कामांना ३४ कोटी रुपयांची मागणी आहे. नाबार्डच्या कामांसाठी ६६ कोटी, तर ९०० कोटी रुपयांची मागणीनिहाय तरतूद ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या बजेटमध्ये केली आहे. या मागणीचे आठमाही नियोजन करण्यासाठी विभागनिहाय बैठकांचेही आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.