जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट

By Admin | Updated: October 29, 2014 00:45 IST2014-10-29T00:42:45+5:302014-10-29T00:45:51+5:30

लातूर : यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य उपाययोजनांसाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार केला

The severe water shortage crisis in the district | जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट

जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट


लातूर : यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य उपाययोजनांसाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार केला असून, ४४८ उपाययोजनांवर हा खर्च अपेक्षित आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मासुर्डी येथे तीव्र पाणीटंचाई असून, या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा असून, २३ एमएम क्यूब इतकेच वापरायोग्य पाणी आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पावसाळा संपण्यापूर्वीच कृती आराखड्यावर काम सुरू केले आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. शिवाय, पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प व बॅरेजेस ज्योत्याखाली आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करून संभाव्य उपाययोजना आखल्या आहेत.
आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी ३७.३५ लाख खर्च अपेक्षित असून, कृती आराखड्यात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ३३१ विंधन विहिरी अधिग्रहण होण्याची शक्यता असून, यावर १ कोटी २ लाख २६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. नवीन ३२ विंधन विहिरी घेण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले असून, त्यासाठी १७.१० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नळ योजना दुरुस्तीच्या संभाव्य तीन योजना आहेत. त्यासाठी ८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीसाठी ४३ योजना आहेत. त्यासाठी ९.६८ लाख रुपये खर्च होणार आहेत.
संभाव्य उपाययोजनेत तात्पुरती पूरक नळयोजना एक असून, त्यासाठी ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विंधन विहिरी व विहिरीच्या खोलीकरणाच्या सात योजना असून, त्यावर ४.५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा एकूण ४४८ उपाययोजनाआॅक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत हाती घेण्याचे संभाव्य नियोजन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. यासाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The severe water shortage crisis in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.