५७ गावांत तीव्र पाणीटंचाई

By Admin | Updated: November 18, 2014 01:07 IST2014-11-18T00:38:52+5:302014-11-18T01:07:19+5:30

लातूर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट असून, सध्या ५७ गावांमधून अधिग्रहणाची मागणी होत आहे.

Severe water shortage in 57 villages | ५७ गावांत तीव्र पाणीटंचाई

५७ गावांत तीव्र पाणीटंचाई


लातूर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट असून, सध्या ५७ गावांमधून अधिग्रहणाची मागणी होत आहे. त्यापैकी २६ प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी पाठविले असून, चार गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यापैकी एका टँकरने जिल्ह्यातील एका गावाला पाणीपुरवठा सुरू आहे.
लातूर तालुक्यातील १५, औसा तालुक्यातील २१, निलंगा तालुक्यातील ९, रेणापूर तालुक्यात ३, अहमदपूर तालुक्यात ८, जळकोट तालुक्यात १ अशा एकूण ५७ गावांत पाणीटंचाईची ओरड होत आहे. जिल्ह्यातील १४ गावांचे तसेच एका वाडीवरून अधिग्रहणाची मागणी आली आहे. यापूर्वी २६ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली होती. त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या ३० गावांत तीव्र पाणीटंचाई असून, एका वाडीवरही भीषण पाणीटंचाई आहे. तर अन्य ५७ गावांतून अधिग्रहणाची मागणी झाली आहे. यापूर्वी अधिग्रहणाचे आठ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीही जिल्ह्यातील आठ गावांनी केली आहे. त्यात लातूर तालुक्यातील तीन, औसा तालुक्यातील दोन आणि अहमदपूर तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला असून, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा तीन महिन्यांचा कृती आराखडा तयार आहे. या कृती आराखड्यानुसार अधिग्रहण करणे, विंधन विहिरी व बोअरची दुरुस्ती करणे, नव्या विहिरी घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.
ज्या गावांचे प्रस्ताव आले आहेत, त्या गावांत पाणीटंचाईची सत्यता पडताळून उपाययोजना करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहे. प्रस्ताव घेऊन ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहेत. नव्याने ५७ गावांतून अधिग्रहणाची मागणी झाली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभाग या ५७ गावांतील पाणीटंचाईच्या स्त्रोतांची पाहणी करीत आहे. शिवाय, आहे ते पाणी काटकसरीने वापरण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Severe water shortage in 57 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.