सत्तर दिंड्या अन् हजारो वारकरी...

By Admin | Updated: June 28, 2014 01:14 IST2014-06-27T23:49:14+5:302014-06-28T01:14:14+5:30

प्रसाद आर्वीकर, परभणी टाळ, मृदंग, खांद्यावर भगवी पताका आणि मुखाद्वारे हरिनामाचा नामघोष मजल दरमजल करीत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या येथील नागरिकांच्या जीवनमानात समरस झाल्या आहेत.

Seventy Dindya and thousands of Warkari ... | सत्तर दिंड्या अन् हजारो वारकरी...

सत्तर दिंड्या अन् हजारो वारकरी...

प्रसाद आर्वीकर, परभणी
टाळ, मृदंग, खांद्यावर भगवी पताका आणि मुखाद्वारे हरिनामाचा नामघोष मजल दरमजल करीत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या येथील नागरिकांच्या जीवनमानात समरस झाल्या आहेत. या दिंड्यांचे आगमन झाले की, आषाढी एकादशीचे वेध लागतात. विदर्भातून येणाऱ्या या दिंडी परभणी शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या दिंड्यांच्या निमित्ताने पंधरा दिवस शहरातील वातावरण भक्तिमय होते.
जून महिना सुरु झाला की वेध लागतात ते पालखी सोहळ्याचे. परभणी तालुक्यातून दैठणा वगळता इतर ठिकाणाहून पंढरपूरला जाणाऱ्या पालखींची संख्या कमी आहे. परंतु, विदर्भामधून अनेक पालख्या या काळात शहरामध्ये दाखल होतात. ज्ञानोबा तुकारामचा गजर करीत शिस्तबद्ध पद्धतीने येणाऱ्या या पालख्यांचे परभणी शहरामध्ये हर्षोउल्हासात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत केले जाते. ठिक ठिकाणी या पालख्यांचे स्वागत तर होतेच शिवाय अनेक जण चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था करतात. मागील अनेक वर्षांची ही परंपरा आजतागायत कायम आहे. दिंडी सोहळ्याचे शहरात आगमन झाल्यानंतर शहरातील वातावरण भक्तिमय होते.
मोठ्या आदबीने वारकऱ्यांचे स्वागत करुन त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जातात. वाशिम, नागपूर, यवतमाळ, अकोला, चांदूरबाजार, नर्सी नामदेव, शेगाव, मुंडनगाव, अकोट, वर्धा, कौंडण्यपूर, अमरावती, वसमत, जवळा बाजार, बुलडाणा आदी ठिकाणाहून या पालख्या शहरातून मार्गस्थ झाल्या. शहरातील शिवरामनगरातील कडूबाईचा मळा या ठिकाणी वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते. तसेच वसमतरोडवरील लक्ष्मण मुंजाप्पा घळे यांच्या वतीने चहा-पानाची व्यवस्था केली जाते. तर रोकड हनुमान संस्थानच्या वतीने मुक्काम व जेवणाची व्यवस्था दरवर्षी नित्यनियमाने करण्यात येते.
सार्इंच्या पादुकांना चंद्रभागेत स्रान
मल्हारीकांत देशमुख, परभणी
पाथरी येथील साईबाबा मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने पाथरी ते पंढरपूर पायी दिंडी काढण्यात येते. दिंडीची परंपरा १५ वर्षाची आहे.
पाथरी येथून साईबाबांच्या पादुका घेऊन तालुक्यातील भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला जातात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे भाविकांचा सर्व खर्च मंदिर व्यवस्थापन समिती करते. मुकुंद दिनकरराव चौधरी हे या दिंडीचे प्रमुख आहेत. दिंडीमध्ये ५०० पेक्षा जास्त भाविक सहभागी होत असतात. साईबाबाच्या पादुका पंढरपूरच्या सोहळ्यासाठी घेऊन जाताना साईभक्तांना धन्यता वाटते.
या दिंडीचे १४ मुक्काम असतात. दशमीला दिंडी पंढरपूर येथे पोहचते. एकादशीच्या दिवशी सार्इंच्या पादुकांना चंद्रभागेत अभिषेक होऊन पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या जातात.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, दिंडीची परंपरा सुरु झाल्यापासून बरेचसे भाविक नियमितपणे आजही दिंडीमध्ये सहभागी होतात. पाथरी व परिसरातील शिक्षित वर्गाचा दिंडीमध्ये सहभाग असतो.
परभणी जिल्ह्यातून निघणाऱ्या दिंड्यामध्ये पाथरी येथील साईबाबा मंदिर व्यवस्थापन समितीच्या दिंडीने आपले वेगळेपण जपले आहे.
पाऊले चालती पंढरीची वाट...
विजय चोरडिया, जिंतूर
टाळ मृदंगाच्या गजरात व विठूनामाचा गजर करीत जिंतूर तालुक्यातील अनेक दिंड्या व वारकरी पंढरीच्या दिशेने कूच करु लागले आहेत.तालुक्यातून वेदांतचार्य ह.भ.प.नथुराम महाराज केहाळकर या प्रतिष्ठेच्या दिंडी बरोबरच आणखी तीन ते चार दिंड्यांचे प्रस्थान पंढरीकडे झाले आहे.
पंढरपूर आणि जिंतूर यांचे समीकरण वारकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचे आहे. तालुक्यातून सुमारे १० ते १५ हजार वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जातात. ह.भ.प.नथूराम महाराज केहाळकर यांची मानाची दिंडी मागील २५ वर्षांपासून जोगवाडा येथून पंढरपूरकडे प्रस्थान करते. या दिंडीमध्ये २०० ते २५० भाविक असतात. दिनकर महाराज जोगवाडकर, रमेशबुवा जोगवाडकर आदींच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघते. दोन वर्षांपूर्वी वेदांतचार्य नथूराम महाराज हे वैकुंठवासी झाल्यानंतर त्यांच्या दिंडीची परंपरा रमेशबुवा जोगवाडकर व दिनकर महाराज जोगवाडकर यांनी पुढेही चालू ठेवली आहे.
या प्रतिष्ठेच्या दिंडीबरोबरच चारठाणा येथून ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे यांची मानाची दिंडीही पंढरीकडे निघाली आहे. या दिंडीतही ३०० ते ४०० भाविक सहभागी होतात. टाळ- मृदंग व ठिकठिकाणी भजन करीत संत नामाचा जय जयकार करीत ही दिंडी आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचते. या दोन महत्त्वाच्या दिंड्या बरोबरच नंदाजी महाराज टाकरस व श्रीराम महाराज यांची धमधम येथून दिंडी निघते. पांगरी येथून नारायण महाराज पांगरीकर हे देखील दिंडीत सहभागी होतात. दिंडीत जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी असली तरी वारकरी सांप्रदायाचा मोठा प्रभाव जिंतूर तालुक्यावर आहे. या तालुक्यातून दहा ते १५ हजार भाविक दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाकडे साकडे घालण्याकरीता अनेक वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत.
३४ वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा
परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका चहाच्या हॉटेलमध्ये ३४ वर्षांपासून वारकऱ्यांना चहापानाची व्यवस्था केली जाते. हॉटेलचे मालक लक्ष्मण मुंजाप्पा घळे जिंतूरकर यांनी हे अखंड सेवाव्रत सुरु केले आहे.
१९८० मध्ये लक्ष्मण घळे हे परभणी शहरात दाखल झाले होते. छोटा-मोठा व्यवसाय त्यांनी सुरु केला. शहरातील एमआयडीसी जवळून जाणाऱ्या वसमत रस्त्यावर चहाचे छोटेसे दुकान त्यांनी सुरु केले. त्या काळात पाऊसमान जास्त असायचे. वसमतरोडवरुन जाणाऱ्या दिंड्यामधील वारकरी पावसात कुडकुडत पुढे जात असताना त्यांनी या वारकऱ्यांना चहापानी करण्यास सुरुवात केली. या कामी त्यांच्या मुलाची मदत होते. विशेष म्हणजे, लक्ष्मण घळे यांनी या रस्त्यावरुन जाणाऱ्या सर्व दिंड्याची नोंदवहीच केली आहे. या दिंड्यामधील वारकऱ्यांची संख्या, प्रत्येक वर्षी किती दिंड्या आल्या, याचा लेखाजोखा त्यांनी सांभाळून ठेवला आहे. सुरुवातीच्या काळात एक- दोन दिंड्यांना चहापानी केले जात होते, आज ही संख्या ६० एवढी झाली आहे. ६० दिंड्यामधून जवळपास २५ हजार वारकऱ्यांना लक्ष्मण घळे हे स्वखर्चातून चहा,दूध देतात. यावर्षी शुक्रवारपर्यंत ५९ दिंड्या आल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाकूरबुवा घराण्याची सव्वाशे वर्षांची परंपरा
बळीराम कच्छवे, दैठणा
परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा येथे संत दत्ताबुवा ठाकूर यांची समाधी असल्यामुळे हे गाव धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. ठाकूरबुवा घराण्याने १२४ वर्षांपूर्वी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर पायी पालखी यात्रा सुरु केली.
या पालखीला माऊलीच्या पालखीचा पुढे २३ वा नंबर असून माऊली पालखीच्या घोड्यांच्या पाठीमागे तिसरा क्रमांक आहे. येथील ह.भ.प.निळोबा महाराज ठाकूर यांनी आपल्या वडिलांसमवेत वयाच्या ८ व्या वर्षापासून वारीला सुरुवात केली. ती ७० व्या वर्षापर्यंत चालविली. त्यानंतर त्यांचा मुलगा ह.भ.प. मधुसूदन महाराज ठाकूर यांनी वयाच्या २३ व्या वर्षापासून पालखीची सुरुवात केली ती आजतागायत मोठ्या जोमात सुरु आहे. संत बुवासाहेब ठाकूर यांची पालखी यावर्षी २१ जून रोजी आळंदी येथून निघाली. या पालखीसोबत सुमारे ४०० ते ५०० वारकरी हातात टाळ, पताका घेऊन हरिनामाचा गजर करीत सहभागी झाले आहेत. पालखीचा पहिला मुक्काम पुणे येथे असून सासवड, जेजुरी, वाला, तरडगाव, फलटन, बारड, नातेफते माळ, सिरसम, बेलापूर, शेगाव, वाकडी असा मुक्काम करीत ही पालखी ८ जुुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

ऊन आणि पाण्याचा प्रश्न मोठा- मधुसूदन महाराज
ह.भ.प. मधुसूदन महाराज ठाकूर यांची या प्रतिनिधीने मुलाखत घेतली. ते म्हणाले यावर्षी उन्हामुळे वारकऱ्यांची संख्या ५० टक्क्यावर आली असून कडक ऊन आणि वाऱ्यामुळे रस्त्याने चालणे कठीण होत आहे. शासनाने वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली असली तरी पाण्यासाठी वारकऱ्यांची गैरसोय होत आहे. पोलिस बंदोबस्त चोख असून वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे प्रत्येक गावातील भाविक मंडळी चांगल्याप्रमाणे अन्नदान करीत आहेत.पालखी निघाल्यापासून आजपर्यंत ऊन आणि पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.
आषाढी सोहळ्यात तालुक्यातून सहा दिंड्यांचा सहभाग
लक्ष्मण दुधाटे,पालम
आषाढी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत तालुक्यातील सहा दिंड्या सहभागी होतात़ चाळीस वर्षांपासून ही समृद्ध परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने चालविली जात आहे़
फळा येथील संत मोतीराम महाराज संस्थानची दिंडी चाळीस वर्षांपासून नित्यनियमाने या सोहळ्यात सहभागी होत आहे़ या दिंडीत १ हजार ५०० भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात़
तांबूळगाव येथील कै़ नरहरी श्यामराव उंदरे पाटील यांनी ही दिंडी वीस वर्षांपूर्वी संत मोतीराम महाराज यांच्याच नावाने सुरू केली होती़ ही दिंडी मागील अनेक वर्षांपासून या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे़ सध्या ही दिंडी विठ्ठल नरहरी उंदरे पाटील हे चालवितात़
पेंडू येथील संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानची दिंडी ८ वर्षांपासून सुरू झाली आहे़ या दिंडीत ६०० हून अधिक वारकरी सहभागी आहेत़ डिग्रस येथील संत कोंडजी महाराज संस्थानच्या वतीनेही मागील चार वर्षांपासून दिंडीच सुरुवात झाली आहे़ या दिंडीमध्ये ७०० वारकऱ्यांची सोय केली जाते़
खोरस येथील राजाराम पाटील तूरनर यांनीही १५ वर्षांपासून श्रद्धेने दिंडीची सुरुवात केली आहे़ या दिंडीमध्ये ३०० वारकरी सहभागी होतात़ आषाढी सोहळयात तालुक्यातील सहा दिंड्या आजही उत्साहाने सुरू आहेत़
वारीत आनंद मिळतो
आळंदी ते पंढरपूर महिनाभर माऊलीच्या पालखीत मी १२ वर्षांपासून सहभागी होत आहे़ विठूरायाचा व माऊलींच्या नामाचा जयघोष करीत दिंडीमध्ये चालतो़ या वारीमुळे आनंद मिळतो़ यामुळे मागील १२ वर्षांपासून दिंडीमध्ये दरवर्षीच सहभागी होतो, अशी प्रतिक्रिया दिगांबरराव कोरडे यांनी दिली़
तालुक्यातील तांबूळगाव येथील संत मोतीराम महाराज यांच्या नावाने २० वर्षांपूर्वी दिंडी सुरू करण्यात आली होती़ ही दिंडी सुरुवातीच्या काळात कै़ नरहरी उंदरे पाटील चालवित होते़ दोन वर्षांपासून त्यांच्या पश्चातही त्यांचा मुलगा विठ्ठल नरहरी उंदरे पाटील दिंडी चालवित आहेत़ वारकऱ्यांची सेवा परंपरेप्रमाणे कायम सुरूच ठेऊ अशी प्रतिक्रिया विठ्ठलराव उंदरे यांनी दिली़
बाभळगावच्या अश्वाला रिंगणाचा मान
विठ्ठल भिसे, पाथरी
महाराष्ट्रातील वारकऱ्यांची मांदियाळी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रा महोत्सवात होणाऱ्या रिंगण कार्यक्रमात धावण्याचा मान बाभळगावला असून यासाठी येथील अश्वदिंडीसह रवाना झाला आहे. या अश्वाची दीडशे वर्षांची परंपरा अखंडित आहे. तर अश्वाच्या मालक, फडकरी आणि योगराज यांचा सत्कारही यात केला जातो.
पाथरी तालुक्यातील कानसूर, बाभळगाव, तारुगव्हाण, डाकू पिंपरी, सारोळा या भागातील दिंड्या दरवर्षी आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला पायी जातात. या दिंड्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबरोबच इतर सुविधाही वारकऱ्यांना ग्रामस्थांकडून पुरविल्या जातात. दरवर्षी जाणाऱ्या दिंड्यामध्ये वारकऱ्यांचा सहभाग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मानाच्या दिंड्यामध्ये वारकरी एकदा सहभागी झाले तर वारी चुकवत नाहीत. पायी दिंडीत सुरुवातीपासून काही वारकरी सहभागी झाले नसले तरी शेवटच्या टप्प्यात वारकरी सहभागी होऊन पंढरपूरची यात्रा करतात.
बाभळगाव येथील पाचशे वारकऱ्यांची दिंडी क्रमांक २ मध्ये १० जून रोजी बाभळगाव येथून मार्गस्थ झाली. १९ जून रोजी या दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी बाभळगावचा आश्व आणि अश्वासोबत फडकरी, योगराज यांचा सत्कार यावर्षी करण्यात आला. अश्वाचे मालक संजय रणेर यांनी यावर्षीचा सत्कार स्वीकारला. बाभळगावच्या दिंडीत गेल्या चाळीस वर्षांपासून सहभागी असलेले वारकरी यावर्षीही सहभागी झाले आहेत. बाभळगावच्या दिंडीसोबतच कानसूर येथील दिंडीतही मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी होतात. या तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंड्या तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पुढे प्रस्थान करतात आणि परतीच्या वेळी काला (प्रसाद) घेऊन पुन्हा मार्गस्थ होतात. अविरत चालणाऱ्या या दिंडीमध्ये मात्र सर्वस्व विसरुन विठ्ठलाच्या नामस्मरणात विलीन झालेले असतात.

नृसिंह पोखर्णीची पायीवारीची परंपरा
त्र्यंबक वडसकर, पोखर्णी नृ.
श्री नृसिंह पोखर्णी येथून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चार दिंंड्या दरवर्षी जातात़ पायीवारीची ही परंपरा चालूच आहे़ ह़भ़प़ मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ वर्षांपूर्वी पहिल्यांदा नृसिंह मदिरात भाविकांनी एकत्र येऊन आळंदी ते पंढरपूर या सोहळ्यात पोखर्णीची दिंडी सहभागी व्हावी, असे ठरविले़ ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळ्यातले दिंडीचे ते पहिले वर्षे होते़ दिंडीमध्ये भाविकांची संख्या वाढत असताना पुढे या दिंड्याच्या संख्येमध्ये वाढ झाली़ आजमितीला चार दिंड्या झाल्या आहेत़ या दिंड्यामध्ये पोखर्णी पंचक्रोशीसह जिल्ह्यातील भाविक यामध्ये सहभागी होतात़ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सोबत असणाऱ्या दिंड्यामध्ये पोखर्णी परिसरातील भाविक भक्तिभावात रंगून जातात़

Web Title: Seventy Dindya and thousands of Warkari ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.