छावणी उड्डाणपुलावर सात वाहनांचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:59 IST2017-09-17T00:59:35+5:302017-09-17T00:59:35+5:30
सात वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.

छावणी उड्डाणपुलावर सात वाहनांचा अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : शहरातून वाळूजकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे छावणीच्या उड्डाणपुलावरून तो मागे गेल्याने मागून येणारी सात वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातामुळे नगर नाका ते लिंक रोड या मार्गावर वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या. वाहतूक शाखा व छावणी पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हलविल्यानंतर दोन तासाने वाहतूक पूर्वपदावर आली.
ट्रक (क्रमांक डब्ल्यू.बी. -१५, बी ७८६४) हा स्क्रॅप घेऊन नगरनाकामार्गे वाळूजच्या दिशेने चालला होता. छावणीच्या उड्डाणपुलावरून वेगाने जाताना पुढे असलेल्या कॅश व्हॅनला ( एम.एच. ४३, ए.डी.१८९८) ओव्हरटेक करीत हा ट्रक जाऊन व्हॅनवर धडकला. या अपघातातात ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे पुलाच्या चढावरून हा ट्रक घरंगळत खाली आला. पाठीमागून वेगाने येणाºया जीपवर ( एम.एम.२० ई.ई ५१९२) जाऊन ट्रक धडकला. यानंतर पाठीमागून येणाºया दोन कार (एम.एम.२०, डी. जे.३६०३ व (एम.एच.१२, जे.झेड.-१५५६) आणि एक खाजगी बस एकमेकांवर जाऊन धडकले. या विचित्र अपघातात पाचही वाहनांचे नुकसान झाले. जीपचालक रामेश्वर गोखले हा जीपमध्ये अडकला होता. अनिल पांढरे व इतरांनी जीपचालक रामेश्वर गोखले यास सुखरूपपणे बाहेर काढले. या अपघातात एकमेकांवर धडकल्यामुळे दोन कार, एक जीप व इतर वाहनांतील चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.
छावणीचे फौजदार महादेव पुरी, वाहतूक शाखेचे केशव विधाते, मिर्झा बिसमिल्ला, शेख बाबर, पोकॉ.शेख, चव्हाण, साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने हलविल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वाहतूक कासव गतीने सुरू झाली.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. रात्री उशिरापर्यंत या मार्गावरून कमी गतीने वाहनांची ये-जा सुरू झाल्यामुळे अडकलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.