कर्ज न देता सात-बारावर बोजा !
By Admin | Updated: April 8, 2017 00:11 IST2017-04-08T00:11:17+5:302017-04-08T00:11:58+5:30
लातूर : ग्राहक मंचने शिराळ येथील एसबीआय बँकेला १५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कर्ज न देता सात-बारावर बोजा !
लातूर : तालुक्यातील कानडी बोरगाव येथील महिला शेतकऱ्याला कर्जाचे वाटप न करताच सातबारावर बोजा दाखविल्याची तक्रार ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात ग्राहक मंचने शिराळ येथील एसबीआय बँकेला १५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कानडी बोरगाव येथील शेतकरी डॉ. अंजली सर्जेराव मोरे यांनी शिराळा येथील एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे ३ लाख ४० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. त्यानंतर बँकेने सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने आवश्यक ती कागदपत्रे बँकेला दिली. त्याप्रमाणे शाखा व्यवस्थापकाने २७ मे २०१५ रोजी संबंधित तलाठ्यास ३ लाख ४० हजार रुपये कर्जाचा बोजा जमीन गट क्रमांक १५० मधील एक हेक्टरवर व तक्रारदाराने तांदुळजा ता. लातूर येथील गट क्र. ३२५ मधील ९९ गुंठे सातबारा उताऱ्यावर लावण्याचे पत्र दिले. त्याप्रमाणे तलाठ्याने दोन्ही जमीनीच्या सातबारावर ३ लाख ४० हजार रुपये शिराळा एसबीआय शाखेच्या बँकेच्या कर्जाची नोंद आहे. त्यानंतर तक्रारदाराने कर्जाच्या रकमेची मागणी बँकेकडे करुनही ती देण्यात आली नाही. या प्रकरणी तक्रारदार डॉ. अंजली मोरे यांनी लातूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. या प्रकरणी मंचाने दिलेल्या निर्णयात बँकेला पाच हजारांचा दंड ठोठावला असून, तक्रारदारास खर्चापोटी १७०० रुपये, मानसिक त्रासापोटी ५ हजार आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ३५०० रुपये देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष प्रदीप निटूरकर, सदस्य श्रीमती रेखा जाधव दिले आहेत.