सेतू चालकाकडून सामान्यांची अडवणूक
By Admin | Updated: November 30, 2014 01:01 IST2014-11-30T00:27:03+5:302014-11-30T01:01:04+5:30
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू चालकाकडून सामान्यांची अडवणूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सेतू चालकाकडून सामान्यांची अडवणूक
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू चालकाकडून सामान्यांची अडवणूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांना रेशन कार्डच्या अर्जांचे वाटप बंद करून केवळ दलालांनाच अर्जांचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी अभय म्हस्के यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सेतू चालकाला नोटीस बजावली आहे.
नागरिकांना विविध प्रमाणपत्र सहज मिळावे यासाठी सेतू सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खाजगी व्यक्तींमार्फत ही केंद्रे चालविली जातात. मात्र, या केंद्रातही नागरिकांची अडवणूक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना रेशन कार्डच्या अर्जांचे वाटप बंद
आहे.
अर्ज मागण्यासाठी आलेल्या नागरिकांना अर्ज शिल्लक नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहेत. दुसरीकडे काही दलालांना मात्र येथूनच अर्जांचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी या प्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी अभय म्हस्के यांच्याकडे तक्रार केली. त्याची शहानिशा करून अन्नधान्य वितरण अधिकारी अभय म्हस्के यांनी सेतू चालकाला नुकतीच नोटीस बजावली आहे.
अर्ज शिल्लक नसतील तर तातडीने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून अर्ज उपलब्ध करून घ्यावेत आणि नागरिकांना त्याचे वाटप करावे, अशा सूचनाही सेतू चालकाला त्यांनी दिल्या आहेत.