बिलासाठी ससेहोलपट
By Admin | Updated: April 16, 2016 00:05 IST2016-04-15T23:26:51+5:302016-04-16T00:05:05+5:30
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड जिल्हा रूग्णालयातील तुघलकी कारभाराचा फटका वैद्यकीय बिलाच्या लाभार्थ्यांना बसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी लाच घेताना पकडलेल्या

बिलासाठी ससेहोलपट
वैद्यकीय देयके : लाचेत अडकलेल्याकडेच चाव्या
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड
जिल्हा रूग्णालयातील तुघलकी कारभाराचा फटका वैद्यकीय बिलाच्या लाभार्थ्यांना बसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी लाच घेताना पकडलेल्या रूग्णालय कर्मचाऱ्यांकडून शल्य चिकित्सकांनी अद्यापही चाव्या घेतलेल्या नसल्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे वैद्यकीय देयके मागण्यास आलेल्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे.
१५ दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रूग्णालयातील हाफिज नावाच्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय देयक मंजूर करतो म्हणून लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले. दरम्यान वैद्यकीय देयकाच्या संदर्भाने जिल्हा रूग्णालय प्रशासनाने पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते. मात्र शुक्रवारपर्यंत वैद्यकीय देयके मागायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वापस लावले जात असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.
आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, अंबाजोगाई तालुक्यातील इतर विभागातील कर्मचारी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय देयकाच्या मंजूरीसाठी येतात मात्र येथे आल्यानंतर लाभार्थ्यांना वैद्यकीय देयकाबाबत कोणतीच माहिती सध्या मिळत नाही. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयकाबाबत विचारले की, ते जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारा, अशी उत्तरे देत आहेत. लाभार्थ्याला जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेण्यासाठी तासन्तास त्यांच्या दालनासमोर उभे ठाकावे लागते. भेट झाल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने लाभार्थी वैतागले आहेत. अनेकांना यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शेकडो फाईल धूळ खात : जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
केवळ वैद्यकीय देयकाच्या शेकडो फाईली अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत.
वैद्यकीय बिल मिळण्याबाबत आम्ही प्रस्ताव दाखल केला याचा अर्थ काय आम्ही चोर आहोत का ? असा सवालही प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित केला.
तीन ते चार महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याचा ‘अर्थ’ काय ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
वैद्यकीय देयकाच्या विभागाचा चार्ज घेण्यास एकही कर्मचारी तयार होत नाही. याबाबत चार्ज नको म्हणून कर्मचारी लेखी देत आहेत. मी देखील कोणाला जबरदस्तीने जार्ज देऊ शकत नाही.
- डॉ. अशोक बोल्डे
जिल्हा शल्यचिकित्सक