अटकेतील चौघांवर गंभीर गुन्हे
By Admin | Updated: July 7, 2014 00:14 IST2014-07-06T23:24:10+5:302014-07-07T00:14:06+5:30
कळंब : तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी गावाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात गुन्हेगारांना कळंब पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गजाआड केले होते.

अटकेतील चौघांवर गंभीर गुन्हे
कळंब : तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी गावाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात गुन्हेगारांना कळंब पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गजाआड केले होते. यातील चौघांविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती कळंब पोलिसांकडून मिळाली आहे.
गुरुवारी रात्री मस्सा खं. गावाजवळील मनुष्यबळ योजना पाटीलच्या लगत असलेल्या एका रोपवाटिकेत सात गुन्हेगार दबा धरून बसले असताना कळंब पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना गजाआड केले होते. त्यांच्याजवळ सापडलेल्या लोखंडी कटावणी, मिरची पूड, चाकू आदी साहित्यावरून त्यांचा एखाद्या ठिकाणी अपराध करण्याचा मनसुबा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अटक केलेल्या दत्ता उमराव शिंदे, बरी बप्पा पवार, सुनील छगन काळे, अनिल उर्फ भरण्या शिंदे, अर्जुन सुब्राव पवार, सुनील शहाजी चव्हाण, सुरेश माणिक पवार, यांच्यापैकी वाकडी येथील सुनील छगन काळे यांच्याविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे चार गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अनिल उर्फ भरण्या उमराव शिंदे यांच्याविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील सुरेश माणिक पवार याच्यावर बीड जिल्ह्यातील धारूर, गेवराई, अंबाजोगाई (ग्रा.) या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. यावरून कळंब पोलिसांनी शिताफीने पकडलेले हे सात जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळल्याने या दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांच्या संभाव्य कृतीस पायबंद बसून पुढील अनर्थ टळलेला आहे. या व्यक्तीच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघडकीस येऊ शकतात. या सातही आरोपींना शुक्रवारी कळंब येथील न्यायालयासमोर हजर केला असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोनि चंद्रकांत सावळे, सपोनि आर. डी. पांचाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)