छत्रपती संभाजीनगर : मुंबईहून वाराणसीकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाचे वैद्यकीय इमर्जन्सीमुळे रविवारी रात्री १० च्या सुमारास चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. विमानातून प्रवास करत असलेल्या एका ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.
इंडिगोच्या मुंबई-वाराणसी विमानाने रविवारी रात्री मुंबईहून नियोजित वेळेनुसार उड्डाण घेतले. उड्डाणानंतर काही वेळातच, एका ज्येष्ठ महिला प्रवाशाची तब्येत बिघडली. प्रवाशाची स्थिती पाहून वैमानिकाने तातडीने छत्रपती संभाजीनगरातील विमानतळावर आपत्कालीन लँडिंगसाठी संपर्क साधला. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आणि काही वेळातच विमान उतरले.
लँडिंगनंतर वैद्यकीय पथकाने वृद्ध प्रवाशाला तपासले; परंतु तोपर्यंत ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली. पोलिस पंचनामा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानाने पुन्हा वाराणसीकडे उड्डाणाचे नियोजन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.