बोगस ताट संख्येसाठी वरिष्ठांचे दबावतंत्र !
By Admin | Updated: April 19, 2016 01:20 IST2016-04-19T00:49:05+5:302016-04-19T01:20:30+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड वैद्यकीय देयकावरून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून आता रुग्णांसाठी देत असलेल्या जेवणाचे ताट (डाएट)

बोगस ताट संख्येसाठी वरिष्ठांचे दबावतंत्र !
व्यंकटेश वैष्णव , बीड
वैद्यकीय देयकावरून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून आता रुग्णांसाठी देत असलेल्या जेवणाचे ताट (डाएट) वाढवून लावण्याबाबत कक्षप्रमुखांवर दबावतंत्र वापरले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
येथील जिल्हा रुग्णालय प्रशासन या ना त्या कारणाने सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. गत आठवड्यापूर्वी वैद्यकीय देयकासंदर्भाने लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. आता पुन्हा नवा मुद्दा समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत जेवण दिले जाते. हे जेवण सर्व वार्डातील गोरगरीब रुग्णांसाठी शासनाने मोफत दिलेले आहे. या जेवणाचे टेंडर वर्षभरापूर्वीच झालेले आहे.
जिल्हा रुग्णालयातील एका वार्डात ६० ते ७० रुग्ण दाखल असतात. यातील २० ते २५ रुग्ण जेवणाचे ताट (डाएट) घेतात. उर्वरित रुग्ण शहरातील किंवा शहराजवळचे असल्याने रुग्णांचे नातेवाईक घरून जेवणाचा डबा घेऊन येतात. मात्र, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांनी डाएट घेतले नाही त्यांचीही नावेही लावत बोगस ताट संख्या वाढविली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जे रुग्ण जेवणाचे ताट घेणार नाही त्यांनाही देण्याबाबत आग्रह करा, अशा वरिष्ठांच्या तोंडी सूचना आहेत. या प्रकारावरून ठेकेदार व रुग्णालय प्रशासन यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
१०० रूपयाला एक ताट...
जिल्हा रुग्णालयात एकूण ३२० वर खाटा आहेत. मात्र, ४०० ते ४५० वर दररोज रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. रुग्णांना अत्यल्प पैशात जेवण मिळावे हा उद्देश आरोग शासनाचा आहे. १०० रूपयांमध्ये दोन वेळा चहा, एक वेळा नाश्ता व दोन वेळा जेवण दिले जाते. या सर्व डाएटसाठी रुग्णांकडून केवळ १० रूपये घेतले जातात. मात्र, ठेकेदाराला शासनाकडून १०० रूपये दिले जात असल्याचेही सांगण्यात आले. रुग्णांच्या जेवणाच्या ताटाआड अर्थकारण दडले आहे.